लखनौ – समाजवादी पक्षाचे (सप) संस्थापक दिवंगत मुलायमसिंह यादव यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात यावे, अशी मागणी त्या पक्षाचे प्रवक्ते आय.पी.सिंह यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवले आहे. मुलायम यांच्या निधनामुळे देशातील समाजवादाचा सोनेरी अध्याय समाप्त झाला आहे. त्यांनी देशासाठी जीवन समर्पित केले. सामाजिक न्यायासाठी ऐतिहासिक लढा दिला. त्यांनी तीनवेळा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रिपद भुषवले. त्याशिवाय, देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची धुराही सांभाळली. तसे असूनही ते नेहमीच तळागाळातील जनतेशी नाळ जोडलेले नेते म्हणूनच वावरले. ते गरिबांचे मसीहा होते, असे सिंह यांनी पत्रात म्हटले आहे. सिंह यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही स्वतंत्र पत्र पाठवले. त्यामध्ये आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेला धरतीपुत्र मुलायमसिंह यादव एक्स्प्रेस वे असे नवे नाव देण्याची मागणी करण्यात आली. मुलायम यांचे 82 व्या वर्षी सोमवारी निधन झाले.