रायपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांच्याच पक्षाकडून (भाजप) अपमान करण्यात आल्याचा दावा छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी बुधवारी केला. त्यासाठी त्यांनी भाजपच्या एका पोस्टरचा आधार घेतला.
छत्तिसगढमध्ये विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्या पोटनिवडणुकीत भाजपने ब्रह्मानंद नेताम यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. त्याचा संदर्भ घेऊन कॉंग्रेस नेते असणाऱ्या बघेल यांनी भाजपला डिवचणारे ट्विट केले.
बलात्कार के आरोपी की तस्वीर के साथ माननीय प्रधानमंत्री जी की तस्वीर लगाकर भाजपा उनका अपमान कर रही है।
हमारे प्रधानमंत्री का अपमान देश नहीं सहेगा।
भाजपा के खिलाफ वोट कर प्रधानमंत्री पद की गरिमा को बचाएँ। @narendramodi #कामVSकांड pic.twitter.com/vSfPtcXUMr
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) November 30, 2022
भाजपच्या पोस्टरवर नेताम यांच्या समवेत मोदी आणि त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची छायाचित्रे आहेत. बलात्काराच्या आरोपी समवेत मोदींचे छायाचित्र छापण्याची कृती त्यांचा अपमान करणारी आहे, असे बघेल यांनी म्हटले.
त्यावरून भाजपने बघेल यांच्यावर पलटवार केला. बघेल यांना बहुधा आरोपी आणि दोषी यांच्यातील फरक समजत नाही. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष असणारे सोनिया आणि राहुल गांधी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात आरोपी आहेत. बघेल हेही बनावट सीडी प्रकरणात आरोपी आहेत. राजकीय कारस्थानाचा भाग म्हणून नेताम यांना आरोपी करण्यात आले, असा प्रत्यारोप भाजपने केला.