नांदुरमध्ये नदीकाठच्या नागरिकांना घर खाली करण्याचे आवाहन

नांदुर (ता दौंड) : तालुक्यात पावसाचा जोर अजूनही कायम असून पूरपरिस्थितीदेखील कायम आहे. येत्या दोन दिवसात देखील अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठ्याने गतवर्षीची पाणी पातळी ओलांडली आहे. त्यामुळे धरणातून सतत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे.
त्यातच आज सायंकाळी मुळा- मुठा नदीचे पुराचे पाणी वाढले आहे. काही घरात देखील पूराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे खबरादारीचा उपाय म्हणून मुळा-मुठा नदीच्या काठी व परिसरात राहणाऱ्या अनेक कुटुंबांना लवकरात लवकर घर खाली करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
याबाबत तालुक्यातील यवत सरकल कोकरे साहेब ,तलाठी किशोर परदेशी ,पोलिस पाटील नेहा बोराटे, सरपंच लता थोरात, सदस्य विशाल थोरात यांनी नागरिकांना समज देऊन घर खाली करा असे आवाहन केले व ज्या घरात पाणी आले अशा नागरिकांची सुरक्षित ठिकाणी सोय केली आहे.





