माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पंख छाटले जाणार?

जयपूर – लवकरच विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या राजस्थानसाठी भाजपने दोन महत्वाच्या समित्यांची स्थापना केली. मात्र, त्या दोन्ही समित्यांमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे शक्तिशाली नेत्या मानल्या जाणाऱ्या वसुंधरा यांचे पंख छाटले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या राजस्थानात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. त्यासाठी भाजपने निवडणूक व्यवस्थापन आणि निवडणूक जाहीरनामा अशा दोन समित्यांची स्थापना केली. मात्र, त्या समित्यांमधून वसुंधरा यांचे नाव गायब असल्याने राजकीय तर्क-वितर्कांना तोंड फुटले आहे. तसे असले तरी भाजपकडून वसुंधरा यांचे महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पक्षाच्या वतीने राजस्थानचे प्रभारी अरूण सिंह यांनी भूमिका मांडली. वसुंधरा या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. त्यांना मोठी भूमिका निभवायची आहे. त्यांनी दोनवेळा मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. त्या पक्षाच्या प्रचारात सहभागी होतील. आम्ही सर्वजण त्यांचा आदर करतो, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
समित्यांची घोषणा झाल्यानंतर भाजपने सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली. तसेच, पक्षाच्या कोअर कमिटीचीही बैठक झाली. मात्र, दोन्ही ठिकाणी वसुंधरा उपस्थित नव्हत्या. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. भाजपच्या सध्याच्या केंद्रीय नेतृत्वाशी वसुंधरा यांचे फारसे सख्य नसल्याचे मानले जाते. अशात वसुंधरा यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार बनवण्याविषयी केंद्रीय नेतृत्वाने बराच काळपासून मौन बाळगले आहे. त्या पार्श्वभूमीवर, महत्वाच्या समित्यांमध्ये वसुंधरा यांचे नाव नसल्याने भुवया उंचावल्या गेल्या आहेत.





