संगमनेर: हाॅर्न वाजवल्याचे कारण, तुफान हाणामारीत 8 जण गंभीर जखमी; 150 जणांवर गुन्हा

संगमनेर – किरकोळ कारणामुळे शहरात तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री 8:30 च्या सुमारास जोर्वे नाका परिसरात घडली. या हाणामारीत धारदार शस्रांचा वापर केल्याने आठजण गंभीर जखमी झाले असून शहर पोलिसात या प्रकरणी 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद आज (सोमवारी) जोर्वे गावातही उमटले असून संतप्त जमावाने दोन दुकानातील सामान रस्त्यावर फेकून जाळून टाकले. त्यानंतर गावात तणावपूर्ण शांतता दिसून आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोर्वे गावातील काही तरुण संगमनेर शहरातील आपले काम आटोपून घरी जात असताना पिकअप गाडीचा हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून त्या युवकांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांनी संगमनेर शहर पोलिसांत जाऊन रीतसर तक्रार नोंदवली.
घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून ते पुन्हा घरी जात असताना, अगोदरच दबा धरून बसलेले 100 ते 150 लोकांनी एकत्र येत हातात तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, चॉपर इत्यादी घेऊन त्या तरुणांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. यात सुमित पोपट थोरात (वय 20), तन्मय राजेश दिघे (वय 18) विजय मंजाबापू थोरात (वय 45), अजय भिमाजी थोरात (वय 45), जितेंद्र कैलास दिघे (वय 29), रवींद्र नामदेव गाडेकर (वय 31), बाबासाहेब शिवाजी थोरात (वय 35, सर्व राहणार जोर्वे, ता.संगमनेर) यांच्यासह एक अल्पवयीन युवक यांच्यावर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत आरोपी बाबू टपरीवाला (पत्ता माहीत नाही), इमरान वडेवाला (पत्ता माहीत नाही), नदीम हुसेन शेख, इमरान (युसुफ पेंटरचा मुलगा), रियाज जहीर शेख (रिक्षावाला), साफिक (चहावाला), साफिक (नाव माहीत नाही), इरफान (पूर्ण नाव माहीत नाही), अकील (टपरीवाला, पूर्ण नाव माहीत नाही), ताहीर नजीर पठाण, शाहिद (वाळूवाला, पूर्ण नाव माहीत नाही), मुसेफ शेख (पूर्ण नाव माहीत नाही), मुज्जू (पूर्ण नाव माहीत नाही), फय्युम फिटर (पूर्ण नाव माहीत नाही), एफफु खान (वडेवाला), आरफत रफिक शेख, इरफान (वडेवाला, व याच्याकडे काम करणारे तीन जण पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) आणि इतर शंभर ते दीडशे यांच्यावर कलम 307, 324, 143, 147, 148, 149, आर्म ऍक्ट 4/25 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक निवांत जाधव हे करीत आहेत.
दरम्यान, आज सकाळी 11:30 च्या दरम्यान जोर्वे गावात दोन दुकानातील सामान बाहेर काढून जाळून टाकण्यात आल्याने आज पुन्हा वाद पेटतो काय असे वाटत असतानाच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्यासह पोलीस निरीक्षक देवीदास ढुमने आणि तालुका पोलिसांचा फौजफाटा जोर्वे गावात पोहचला. ते पोहचेपर्यंत सगळे निघून गेले होते. त्यामुळे ते कोणी पेटवले हे मात्र समजू शकले नाही. या घटनेनंतर गावातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
“दुर्दैवाने असा प्रकार घडायला नको होता.पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सर्वांनी सलोख्याची भूमिका घ्यावी. समाजकंटकांवर कारवाई शंभर टक्के होणार आहे. विशेष म्हणजे अतिक्रमण झाल्यामुळे आणि अतिक्रमणावरती अवैद्य धंदे करणाऱ्यांचा सुळसुळाट झालेला आहे.खरं म्हणजे नगरपालिकेने तात्काळ कारवाई करून ते अतिक्रमण हटवले पाहिजे. ज्याप्रमाणे आम्ही नगरचा अतिक्रमण काढले, शेवगावचा अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या तसेच संगमनेरमध्येही अतिक्रमण काढल गेला पाहिजे. पालकमंत्री म्हणून मी तसे पालिकेला सांगितले आहे, आजच्या कारवाईनंतर निश्चितच पुढची परिस्थिती सुधारेल.”
– राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री
“संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला. त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.सर्व नागरिकांना असे आवाहन आहे की नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणताही अनुचित प्रकार कोणता व्यक्ती कुठे करत असेल तर पोलिसांना कळवा जेणेकरून आपल्याला होणाऱ्या घटनांना आळा घालता येईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राखण्यात येईल.”
– सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी





