आॅलिम्पिक पुढे ढकलेले जाऊ शकते – सॅबेस्टियन को

लंडन – करोनावर अद्याप नियंत्रण मिळविण्यात यश आलेले नाही अशा परिस्थितीत जगभरातील क्रीडापटूंच्या आरोग्याशी खेळ करण्यापेक्षा ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी आता खुद्द आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सॅबेस्टियन को यांनीच केली आहे.
यंदा जपानमध्ये ही स्पर्धा होत आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) जरी ही स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होईल असे सांगत असले तरीही त्यांनीही आता फेरविचार करण्याची गरज आहे. या स्पर्धेत जगभरातील अनेक देशांचे खेळाडू सहभागी होतील, त्यांच्या आरोग्याशी खेळ करणे योग्य नाही. सध्याचे वातावरण पाहता करोनाचा धोका वाढताना दिसत आहे, तसेच यावर अद्याप कोणतेही खात्रीलायक उपाय सापडलेला नाही मग ही स्पर्धा धोका पत्करुन खेळविण्याचा अट्टहास कशासाठी, अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
ही स्पर्धा आणखी दोन महिने पुढे ढकलली तरी कोणाची हरकत नसावी. जपानने या स्पर्धेसाठी खूप आर्थिक गुंतवणूक केली आहे, त्यांचेही नुकसान होऊ नये ही अपेक्षा आहेच पण त्याचबरोबर स्पर्धा पुढे ढकलली गेली व त्यावेळी करोनाचा प्रभाव ओसरला असेल तर प्रत्येक जण मनापासून आनंदाने या स्पर्धेत सहभागी होईल, असेही को यांनी व्यक्त केले.





