TET Exam Scam : 56 परिक्षार्थींकडून घेतले प्रत्येकी 40 हजार रुपये, पोलिस तपासात उघड

पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात आरोपींनी 56 परिक्षार्थींकडून प्रत्येकी 40 हजार रुपये घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. निखिल कदम याने अश्विनकुमार शिवकुमार याला 4 ऑक्टोंबर 2019 रोजी केलेल्या ई-मेलमध्ये या गोष्टी नमूद करण्यात आल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाला दिली. गुन्हयाच्या अधिक तपासासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांनी कदम, शिवकुमारसह सौरभ त्रिपाठी यांच्या पोलिस कोठडीत 2 जानेवारीपर्यंत वाढ केली.
बचावपक्षातर्फे अॅड. प्रणयकुमार लांजिले, अॅड. अनिकेत डांगे, अॅड. लक्ष्मण सावंत यांनी काम पाहिले. युक्तिवादादरम्यान अॅड. जाधव म्हणाले, कदम याने शिवकुमार याला टीईटीच्या परिक्षार्थींकडून पैसे घेतल्याबाबतचा ई-मेल केला असल्याचे दिसून येत आहे. त्रिपाठी याच्या उपस्थितीत त्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप व मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करायचे आहे.
आरोपी व त्यांच्या साथीदारांनी बनावट गुणपत्र कोठे व कोणी तयार केले याबाबतचा तपास करायचा आहे. याप्रकणातील सुखदेव डेरे याच्या गावच्या राहत्या घराच्या झडतीदरम्यान 2 लाख 90 हजार 380 रुपये रोख स्वरुपात मिळून आले असल्याने त्याचा तपास करायचा आहे. याखेरीज, गुन्हयाच्या अधिक तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी अॅड. जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.





