सिनसिनाटी टेनिस स्पर्धेत चांगली कामगिरी करीन – अँडी मरे

सिनसिनाटी – दुखापतीमधून मी शंभर टक्के तंदुरूस्त झालो आहे. भरपूर सरावाच्या जोरावर सिनसिनाटी टेनिस स्पर्धेत चांगली कामगिरी करीन असा आत्मविश्वास अँडी मरे याने येथे व्यक्त केला.
मरेने आतापर्यंत तीन वेळा ग्रॅंड स्लॅम विजेतेपदांची कमाई केली आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी त्याला रॉबर्टो बॅटिस्टा ऍग्यूटकडून पाच सेट्सच्या लढतीनंतर पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्याला स्नायूंच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्याला स्पर्धात्मक टेनिसपासून दूर रहावे लागले होते. मरे म्हणाला की, पूर्वीसारखा माझा खेळ होईल की नाही याची शाश्वती मी देऊ शकणार नाही. मात्र खेळाचा आनंद घेण्यासाठीच मी पुन्हा उतरलो आहे.
मरेची येथे पहिल्या फेरीत फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटशी गाठ पडणार आहे. त्याने येथे 2008 व 2011 मध्ये अजिंक्यपद मिळविले होते.





