Sugar Price hike : साखरेचे भाव तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, कारण काय?
Sugar Price hike : राज्यातील साखरेच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली असून घाऊक आणि किरकोळ बाजारात दरांनी उच्चांकी पातळी गाठली आहे.

Sugar Price hike : राज्यातील साखरेच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली असून घाऊक आणि किरकोळ बाजारात दरांनी उच्चांकी पातळी गाठली आहे. गेल्या महिनाभरात घाऊक बाजारात प्रति क्विंटल ४०० ते ४५० रुपयांची वाढ झाली असून किरकोळ बाजारात साखर प्रतिकिलो ६ ते ७ रुपयांनी महागली आहे. त्यामुळे मोठ्या साखरेचा किरकोळ दर ४९ ते ५१ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला असून सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर त्याचा परिणाम होत आहे.
केंद्र सरकारने जुलै महिन्यासाठी देशांतर्गत विक्रीचा साखर कोटा कमी केल्याने बाजारातील पुरवठा मर्यादित झाला आहे. त्याचबरोबर २०२५-२६ च्या गळीत हंगामात साखर उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षी २७७ लाख टनांवर असलेले उत्पादन यंदा १९९ लाख टनांवर घसरल्याने कारखान्यांकडील साखरेचा साठाही कमी झाला आहे. परिणामी बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे.
जून-जुलैमध्ये झालेल्या अपुऱ्या पावसाचा उसाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामात साखर उत्पादनात आणखी २० ते २५ टक्क्यांची घट होण्याची शक्यता साखर उद्योग क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे श्रावण, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांमुळे पुढील काही महिन्यांत साखरेची मागणी वाढणार असल्याने दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
घाऊक व्यापाऱ्यांच्या मते, साखर उत्पादनातील घट, कमी विक्री कोटा आणि पुढील हंगामाबाबतची अनिश्चितता यामुळे कारखान्यांकडूनच साखर महाग मिळत आहे. त्यामुळे व्यापारी आणि मोठे ग्राहक आगाऊ खरेदी करत असून बाजारातील तेजी कायम आहे.”
किरकोळ व्यापारी म्हणतात की, घाऊक दरवाढीचा थेट परिणाम किरकोळ विक्रीवर झाला आहे. वाढीव दराने साखर खरेदी करावी लागत असल्याने किरकोळ भाव वाढविणे अपरिहार्य ठरले आहे.
साखर कारखान्याच्या म्हणण्यानुसार जूनअखेर कारखान्यांना साखर तोट्यात विकावी लागत होती. आता दरात सुधारणा झाली असली तरी उत्पादन खर्च भागविण्यासाठी साखरेचा दर किमान ४,३०० रुपये प्रति क्विंटल असणे आवश्यक आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या ‘प्राईस मॉनिटरिंग सिस्टिम’नुसार देशातील प्रमुख शहरांतील साखरेसह २२ जीवनावश्यक वस्तूंचे घाऊक व किरकोळ दर नियमित नोंदविले जातात. या आकडेवारीनुसार गेल्या चार दशकांत साखरेच्या किरकोळ दरात सातत्याने वाढ झाली आहे.
१९८५ मध्ये प्रतिकिलो ५.५० ते ६.५० रुपये असलेली साखर २०२५-२६ मध्ये ४६ ते ४८.७० रुपयांवर पोहोचली असून सध्या अनेक ठिकाणी किरकोळ दर ५१ रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत.





