भरधाव ट्रकची जीपला जोरदार धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

श्रीगोंदा – नगर- दौड महामार्गावरील घारगाव शिवारातील निलगिरी हॉटेलनजीक झालेल्या महाराष्ट्र शासनाची जीप व खासगी ट्रक यांच्या भीषण अपघातात माथाडी महामंडळातील निरीक्षक प्रभाकर निवृत्ती लोंढे (वय 57) आणि चालक अशोक पुंजाबा औटी (वय 48 दोघेही रा. अहमदनगर) हे जागीच ठार झाले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, माथाडी कामगारांचे निरीक्षक निवृत्ती लोंढे हे राशीनवरून श्रीगोंदामार्गे नगरकडे जीप (क्रमांक एम एच 17, ए एन 0052) मधून चालले होते. दौंडकडे चाललेल्या ट्रकने (क्रमांक एम एच 12, जे एस 9444) बोलेरोला समोरून धडक दिली आणि दोघांचा या अपघातात दुुर्देवी मृत्यू झाला.
अपघाताची माहिती समाजताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद माने व त्यांच्या टीमने घटनास्थळाकडे धाव घेतली. या भीषण अपघातात मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी गॅस कटरचा वापर केला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, गवळी, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर पठारे, नंदकुमार पठारे, चालक भाऊ शिंदे, धांडे, भांडवलकर यांना पोलीस पाटील सतिश निभोंरे, सतिश लगड, कैलास खोमणे, विनायक चौधरी, रमेश मोळक, रमेश लगड या स्थानिक तरुणांनी मदत केली.





