Shivsena: ठाकरे गटाचे हे दोन खासदार शिंदे गटात जाण्याचा प्रयत्न करताहेत? बड्या मंत्र्याच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
Shivsena: शिवसेनेतील ‘इनकमिंग’च्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात हालचाली वेग घेत असल्याचे चित्र असून, येत्या काळात नेमके काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shivsena: परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याबरोबर आता धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. मात्र, या सर्व चर्चा निराधार असल्याचे निंबाळकर यांनी स्पष्टपणे सांगत पक्षांतराच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या घडामोडींवर भाष्य करताना ‘आगे आगे देखो होता है क्या’ असे सूचक विधान केले. धाराशिवमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ सुरू असून, सामान्य कार्यकर्त्यांपासून ते आमदार, खासदार आणि माजी मंत्र्यांपर्यंत अनेक जण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होत आहेत.
ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत विचारले असता आबिटकर यांनी थेट नाव घेणे टाळले. मात्र, शिंदे यांच्या कामावर विश्वास ठेवून अनेक जण पक्षात येत असल्याचे सांगत त्यांनी या चर्चांना अप्रत्यक्षपणे दुजोरा दिल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, माध्यमाशी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी पक्षांतराच्या चर्चांना स्पष्ट नकार दिला. “गेल्या काही महिन्यांपासून अशा चर्चा सुरू आहेत, मात्र त्यात कोणतेही तथ्य नाही. विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत,” असे त्यांनी म्हटले. शिवसेनेचा ठाकरे गट सोडून शिंदे गटात येण्यासाठी यापूर्वीही प्रस्ताव आले होते, मात्र त्याकडे कधीच लक्ष दिले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, राज्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील काही खासदार आणि आमदारांमध्ये निधी मिळण्याबाबत चिंता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सत्ताधारी गटात जाण्याबाबत पडद्यामागे चाचपणी सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
अलीकडेच संजय जाधव यांचा एका मुस्लिम कार्यकर्त्यासोबतचा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात “काळाचे भान ठेवून निर्णय घ्यावे लागतील” असे त्यांनी म्हटल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या संभाव्य भूमिकेबाबतही चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, शिवसेनेतील ‘इनकमिंग’च्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात हालचाली वेग घेत असल्याचे चित्र असून, येत्या काळात नेमके काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





