Shankaracharya POCSO case: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश; प्रयागराज न्यायालयाचा मोठा निर्णय
Shankaracharya POCSO case: १३ फेब्रुवारी रोजी या प्रकरणात पीडित मुलांचे जबाब नोंदवण्यात आले होते, त्यानंतर न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे.

Shankaracharya POCSO case: शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रयागराजमधील विशेष पोक्सो न्यायालयाने दिले आहेत. १३ फेब्रुवारी रोजी या प्रकरणात पीडित मुलांचे जबाब नोंदवण्यात आले होते, त्यानंतर न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे.
आशुतोष महाराज यांनी लावले गंभीर आरोप –
रामभद्राचार्य यांचे शिष्य आशुतोष महाराज यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात आशुतोष महाराज यांनी स्वतःच आपली बाजू न्यायालयात मांडली. १३ फेब्रुवारी रोजी विशेष न्यायाधीश विनोद कुमार चौरसिया यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत त्यांनी सांगितले की, दोन शिष्यांनी त्यांच्याकडे येऊन लैंगिक शोषणाची आपबीती सांगितली होती. याप्रकरणी एफआयआर (FIR) नोंदवून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
‘बंद खोलीत’ मुलांचे जबाब आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग –
न्यायालयाच्या आदेशानुसार, १३ फेब्रुवारी रोजी कोर्ट रूम रिकामी करून केवळ दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या उपस्थितीत अल्पवयीन मुलांची साक्ष घेण्यात आली. या मुलांनी न्यायाधीशांसमोर त्यांच्यासोबत घडलेल्या कथित अत्याचाराची माहिती दिली. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले असून जबाब बंद खोलीत (In-camera proceedings) नोंदवण्यात आले आहेत.
हेही वाचा : भाजप आमदाराला 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक; दोन स्वीय सहाय्यकही जाळ्यात
जीवे मारण्याच्या धमक्यांचा दावा –
सुनावणी दरम्यान आशुतोष महाराज यांनी खळबळजनक दावा केला की, हे प्रकरण लावून धरल्यामुळे त्यांना सतत धमक्या मिळत आहेत. “माझी कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून माझी हत्या होण्याची शक्यता आहे,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
८ फेब्रुवारी रोजी आशुतोष महाराज यांनी प्रयागराजच्या विशेष पोक्सो कोर्टात तक्रार दाखल केली होती. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिविर आणि गुरुकुलात मुलांचे शोषण केले जात असून, यामागे बेहिशोबी मालमत्ता आणि अवैध शस्त्रास्त्रांचा व्यवहार असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. न्यायालयात या प्रकरणाशी संबंधित अनेक सीडी (CD) सादर करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
गुरु-शिष्य परंपरेचा दाखला –
न्यायाधीशांनी जेव्हा आशुतोष महाराज यांना विचारले की, तुम्ही या मुलांचे पालक म्हणून कोणत्या आधारावर उभे आहात? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, “गुरु परंपरेनुसार पीडितांना न्याय मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे आणि पीडित मुलांनी स्वतः मदतीसाठी माझ्याशी संपर्क साधला होता.”
या आदेशानंतर आता पोलीस शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.





