शाहरुख खानचा आज वाढदिवस, नेहमीच गजबज असणाऱ्या ‘मन्नत’ बाहेर मात्र ‘शुकशुकाट’

Shah Rukh Khan birthday – बॉलिवूडचा किंग खान सुपरस्टार अभिनेता शाहरुखचा आज 59 वा वाढदिवस आहे. शाहरुखच्या वाढदिवसासाठी देशातील अनेक भागातून त्याचे चाहते मुंबईत येतात. आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी शाहरुखही त्याच्या ‘मन्नत’ या निवास स्थानाबाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारतो. पण यंदाचा हा वाढदिवस शाहरुखसाठी जरा वेगळा ठरत आहे. कारण एरवी बरीच गजबज असणाऱ्या मन्नतबाहेर मात्र आज शांतता आहे.
शाहरुखच्या ‘मन्नत’ घराबाहेर जमलेल्या हजारोंच्या गर्दीला पोलिसांनी हटवलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शाहरुखच्या चाहत्यांना मन्नतच्या बाहेर उभे राहण्याची परवानगी दिली जात नसल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शाहरुख माध्यमांपासून बराच दूर राहिला आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड सेलिब्रेटी आणि पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. कारण बाबा सिद्दीकी यांचं सलमान खान सोबतचं नातं चांगलं असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचं बिश्नोई गँगने सांगितलं आहे. त्यामुळेच शाहरुख खान आज मन्नत बाहेर पडणार नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.
दरम्यान दरवर्षीप्रमाणे जसा शाहरुख त्याच्या वाढदिवसाला मन्नत बाहेर येऊन त्याच्या चाहत्यांना झलक देतो तसा तो यंदाच्या वर्षी येणार नाही. कारण पोलिसांनीच त्यासाठी परवानगी नाकारली आहे. सकाळपासून मन्नत बाहेरुन गर्दी हटवण्यास पोलिसांनी सुरुवात केली. त्यामुळे सध्या मन्नत बाहेर बरीच शांतता आहे.
सलमान खान आणि शाहरुख खान चांगले मित्र –
सलमान खान आणि शाहरुख खान चांगले मित्र आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये संघर्षाच्या काळात सलमानने शाहरुखला मदत केली होती. शाहरुख जेव्हा मुंबईत नवीन-नवीन आला होता आणि स्ट्रगल करत होता, तेव्हा सलमानने त्याची फार काळजी घेतली होती. शाहरुख अनेक वेळा सलमान खानच्या घरी जेवला. शाहरुखने एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, “मी आज इथे आहे, ते सलमान आणि त्याच्या कुटुंबामुळे आहे, कारण मी याच्या घरचं अन्न खाल्लं आहे”. यानंतर स्ट्रगल आणि मेहनतीच्या बळावर शाहरुखने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:च नाव कमावलं आणि बॉलिवूडचा ‘किंग’ बनला. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी बिष्णोई गँगने दिली आहे. शाहरुख खान सोबतही काही बरे वाईट घडू शकते त्यामुळे काळजी घेण्यात आली आहे.





