‘सत्य’ बोलणारे सरकारसाठी ‘देशद्रोही’; राज्यसभेत शिवसेना नेते संजय राऊत यांचा ‘हल्लाबोल’

नवी दिल्ली – सत्य बोलणाऱ्यांची संभावना भारतीय जनता पक्षाकडून देशद्रोही अशी केली जात आहे. सरकारवर टीका करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेत शुक्रवारी केली.
शेतकरी केवळ त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत, म्हणून त्यांना राष्ट्रद्रोही आणि खलिस्तानवादी ठरवले जात आहे. मंत्री धर्मेंद्र प्रधान आम्हाला सत्य ऐकण्याचे आवाहन करत होते. आम्ही गेले सहा वर्ष सत्यच ऐकत आहोत. एवढेच नव्हे तर असत्यही आमच्यावर सत्य म्हणून लादले जात आहे. सध्या देशात असे वातावरण आहे, की कोणी सत्य लिहले की त्याच्यावर देशद्रोही, बंडखोर असल्याचा शिक्का लावला जातो, असेही ते म्हणाले.
मोदी सरकार भारतीय दंड संहीता बदलून केवळ देशद्रोहाचीच कलमे मांडली आहेत, असे वाटण्याजोगी स्थिती आहे. कोणत्याही गोष्टीसाठी देशद्रोहाचा गुन्हा लावला जात आहे. भाजपा घरगुती हिंसाचारासाठीही देशद्रोहाचा गुन्हा नोंदवत आहे, असे सांगून पार्थो दासगुप्ता आणि अर्णब गपोस्वामी यांच्यातील संभाषणाचा दाखल देत राऊत म्हणाले, बालाकोट हल्ल्याची माहिती देऊन सरकारी गोपनियता कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना हे सरकार संरक्षण देत आहे. त्याच्या सारख्या (अर्णब) आणि कंगना सारख्या लोकांना सरकार देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत आहे.
शंभर शेतकरी बेपत्ता
प्रजासत्ताक दिनी झालेल्या आंदोलनानंतर सरकारने 200 शेतकऱ्यांना अटक केली आहे. तर 100 तरूण बेपत्ता आहेत. त्याचे काय झाले याची कोणाला कल्पना नाही. मात्र, मुख्य आरोपी दीप सिध्दू अद्याप मोकाट आहे, असेही राऊत यांनी सांगितले.





