लाल मिरचीचाही ‘ठसका’; उत्पादनात घट, परदेशांतूनही मागणी

पुणे –चव आणि गुणवत्ता असल्याने भारतात उत्पादित लाल मिरचीला जगभरातून मागणी वाढत आहे. त्यामुळे निर्यात वाढली आहे. दरम्यान, यंदा कीटकांचा हल्ला आणि अवेळी पावसामुळे मिरचीच्या विविध प्रजातींच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन झाले आहे. तर, मागणी मात्र वाढली आहे.
…म्हणून उत्पादन घटले
देशात आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांत मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर, अवेळी पावसामुळे आणि रखडलेली लागवड ही मिरचीच्या कमी उत्पादनाची प्रमुख कारणे आहेत. महाराष्ट्रात कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून मिरचीची आवक होत आहे. यातील तब्बल 80 टक्के आवक ही दुय्यम दर्जाची आहे. परिणामी, चांगल्या दर्जाच्या मालाचे भाव तेजीत आहेत. ब्याडगी मिरचीची आठवड्यात 4 ते 4.5 लाख पोत्यांची आवक असते, तर गुंटूरमध्ये 50 ते 60 हजार पोत्यांची रोजची आवक असते.
मसाला उद्योगाकडून मागणी
राज्यात नागपूर, पुणे, वाशी, सांगली, नगर आणि नंदुरबार मार्केटमध्ये मिरचीची सर्वाधिक उलाढाल होते. पुण्यातून मसाला प्रक्रिया उद्योगांकडून तसेच मसाला विक्रेते, कोकण, सातारा व पुणे जिल्ह्यातून मिरचीला सर्वाधिक मागणी असते. शिवाय, काही व्यापारी आणि उद्योजक ऍडव्हान्स बुकिंग करून मिरची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करतात.
आपल्या देशात होणाऱ्या एकूण मिरची उत्पादनापैकी जवळपास 70 टक्के मिरची देशांतर्गत वापरली जाते. तर 30 टक्के निर्यात केली जाते. भारतातून निर्यात होणाऱ्या सर्व मसाल्यांमध्ये सुक्या मिरचीची निर्यात सर्वांत जास्त आहे. यंदा ही निर्यात वाढली आहे.
– वालचंद संचेती,
माजी अध्यक्ष, दी पूना मर्चंट्स चेंबर





