श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपती देवस्थानची सुरक्षा ‘रामभरोसे’

रांजणगाव गणपती – रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत २१ बांगलादेशी नागरिक आढळल्यानंतरही रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची डोळ्यावरील झापड उडाली नसून तीर्थक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थानची सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याचे दिसून येत आहे.
कारण महागणपती मंदिरासमोरील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी पोलीस चौकी चतुर्थी वगळता अन्य दिवशी कुलूप बंद असते. तसेच ऐन निवडणुकीच्या काळात दहशतवादी विरोधी पथकाने कारेगाव येथे २१ बांगलादेशी नागरिकांना पकडल्याने देवस्थानच्या सुरक्षेचा ही प्रश्न निर्माण झाला असून रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट व रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन नक्की कोणत्या ब्रह्मात आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या परिसरात यापूर्वी सन २०११ साली ढोक सांगवी येथे बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महागणपती मंदिर परिसरामध्ये एक किंवा दोन पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी रुजू करण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना महागणपती मंदिर परिसरामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा विसर पडलेला दिसून येत आहे.
भाद्रपद महोत्सव व महिन्यातून येणारी चतुर्थी या काळातच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसून येतो. इतर वेळी मात्र या ठिकाणची पोलीस चौकी कायम कुलूप बंद असते. राज्यासह देशभरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे महागणपती मंदिर कायमच भाविकांच्या गर्दीने भरून गेलेले असते. त्याचाच फायदा घेऊन या ठिकाणी भुरट्या चोऱ्या ही वाढल्या आहेत. बुधवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी तर हमखास मोबाईल चोरी ठरलेलीच असते. मात्र तक्रार देऊन काहीच फरक पडत नसल्याने मोबाईल चोरी झालेले नागरिक पोलीस स्टेशनला जाणे टाळतात.
या सुरक्षे बाबत रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष स्वाती पाचुंदकर यांच्याशी संपर्क साधला असता, रांजणगाव महागणपती मंदिर परिसरात कायमस्वरूपी एक किंवा दोन पोलीस कर्मचारी उपलब्ध व्हावे, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस कार्यालयाशी पत्र व्यवहार केला आहे. या पत्र व्यवहाराला अनुसरून पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली, असल्याचे देवस्थानच्या अध्यक्ष्या स्वाती पाचुंदकर यांनी सांगितले.





