“महागाई कमी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे” – रामदास आठवले

सरकार लोकांच्या बाजूने आहे. महागाई कमी करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. तीन वर्षापासून लोकांना स्वस्तात अन्नधान्य दिले जात आहे, असे केंद्रीय रामदास आठवले यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. कसबा पोटनिवडणुकीबाबत बोलताना आठवले म्हणाले की, या यशाने महाविकास आघाडीने हुरळून जावू नये. कर्नाटक, राज्यस्थानातील निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळणार आहे. नागालॅंडमध्ये आरपीआयने आठ जागा वढवल्या होत्या. त्यातील दोन जागा आम्हाला मिळाल्या आहेत.
दरम्यान, 2024 च्या लोकसभेची तयारी सुरु झाली आहे. सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. अशात उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात अशीही चर्चा सुरु आहे. यावर बोलताना आठवले म्हणाले की, आपल्या देशात पंतप्रधानपदाचे 15-20 उमेदवार आहेत. नरेंद्र मोदी यांच्याशी सामना करणे येड्यागबाळ्याचे काम नाही, लोकांची कामे केली आहेत. त्यामुळे 2024 ला आम्हाला यश मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रपद सांभाळता आले नाही, त्यामुळे ते पंतप्रधानपदासाठी सक्षम नाहीत, असा टोला यावेळी आठवले यांनी लगावला.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. यावर बोलताना आठवले म्हणाले की, नाफेडकडून कांदा खरेदीसाठी सरकारने निर्णय घेतला आहे. कांद्याला दर मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. कांद्याचा दर फिक्स होणे गरजेचे आहे.





