Pimpri : ‘लोणावळा थंड हवेसाठी प्रसिद्ध, पण येथील हवा थंड राहिली नाही’

लोणावळा : लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे, पण येथील हवा थंड राहिलेली नाही अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय तथा अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. लोणावळा शहराच्या विकासासंदर्भात, विविध प्रश्नाच्या संदर्भात आणि येथील पर्यटनाशी निगडित परंतु रखडलेल्या प्रकल्पांसंदर्भात माहिती व आढावा घेण्यासाठी ते लोणावळा नगरपरिषदेमध्ये आले असता माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना, येथे होत असलेला पर्यावरण ऱ्हास रोखून येथील हवामान थंड कसे राहील यावर सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी अंकुश जाधव, आरपीआयचे राज्य सचिव सूर्यकांत वाघमारे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनागरध्यक्ष श्रीधर पुजारी, सर्व पक्षांचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक, नगरसेविका आणि नगरपरिषद अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री आठवले यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत प्रामुख्याने खंडाळा रोप-वे प्रकल्प, इंद्रायणी नदी सुशोभिकरण व स्वच्छता, राजमाजी गार्डन जागा मिळणेबाबत, वलवण ते खंडाळा उड्डाणपूल, भुशी डॅम पर्यटन स्थळात घोषित करुन विकसित करणे, तुंगार्ली धरण मजबुतीकरण करणे, खंडाळा तलाव (टप्पा क्रमांक २) चे सुशोभिकरण करणे, वलवण तलाव (टप्पा क्रमांक 3) चे सुशोभिकरण करणे, लोणावळा शहरात काम सुरू असलेल्या रेल्वे संग्रहालयाबाबत आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज (पुरंदरे मैदान लगत) स्टेडियम विकसित करणे या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
विविध विकासकामांसाठी निधी देण्याचे आश्वासन
वरील सर्व मुद्द्यांची सविस्तर माहिती घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी इंद्रायणी नदी सुशोभीकरण कामी ४० ते ५० कोटींचा निधी, खंडाळा तलाव सुशोभीकरण कामी ५ ते ७ कोटींचा निधी, वलवण तलावाच्या सुशोभीकरण कामी ८ कोटींचा निधी, वलवण ते खंडाळा उड्डाणापुलासाठी, रुंदीकरण आणि भूसंपादनासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून चांगला निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला. भुशी धरण परिसरात रेल्वे विभागाकडून भिंत उभारण्याचे काम सुरू असून त्यामुळे शहराच्या पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाशी चर्चा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.





