Pimpri : पल्लवी दाभाडे यांना ‘राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच’ पुरस्कार

मावळ : माळवाडी (ता. मावळ) गावच्या सरपंच पल्लवी संपत दाभाडे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी मराठी सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद, पर्यावरणमंत्री विजय राज, वाईचे खासदार नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दिल्ली येथे पुरस्कार स्विकारणाऱ्या पल्लवी दाभाडे या माळवाडी गावच्या पहिल्या महिला सरपंच आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक व सहकार महर्षी ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे यांच्या त्या सूनबाई आहेत.
पल्लवी दाभाडे यांनी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला. त्यांनी महिलांसाठी नथ बनवणे, आरी जरदोशी वर्क, योगा क्लास, भजन क्लास, भाज्याची ग्रेव्ही क्लास, आरोग्य शिबिर, पेंटींग क्लास, कापडी बॅग बनविणे आदींचे प्रशिक्षण शिबिरही घेतले आहेत. राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच पल्लवी दाभाडे यांचे तालुक्यात विशेष अभिनंदन व कौतुक होत आहे.
गावात विविध योजना राबविल्या
गावपातळीवर राबविलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना, सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सर्व सुविधायुक्त इमारत, अंगणवाडी शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, गावातील मंदिरे, विहीर – तलाव स्वच्छता, पाणीपुरवठा योजना, सुसज्ज दशक्रीया घाट, गावातील अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटार योजना आदी केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार मिळाला असल्याचे सरपंच पल्लवी दाभाडे यांनी सांगितले.





