Pune Swargate Case: आरोपी गाडेचे वकील म्हणाले, ‘दोघांमध्ये संमतीने….तरूणी स्वत:हून बसमध्ये चढली’

Pune Swargate Case: पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (37) अटक करण्यात आली असून त्याला पुणे कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजुची सुनावणी पार पडली व आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दोघांमध्ये संमतीने शारीरिक संबंध असल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे. कोणताही प्रतिकार केला नाही, तरुणी स्वत:हुन बसमध्ये चढली, असाही दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे. तर सरकारी वकिलांनी आरोपीवरील गुन्ह्यांची माहिती कोर्टात दिली आहे.
पिडीतेवर आरोपीने दोनवेळा बलात्कार केला. तसेच तिला आपण बसचा वाहक असल्याचे सांगीतले होते, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली असून 14 दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोपीवर 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपी दोन दिवसांपासून फरार होता. त्याच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी 13 विशेष पथके तयार केली होती. गुरुवारी रात्री उशिरा शिरूर तालुक्यातील एका गावातून त्याला अटक करण्यात आली. गाडेला आज (शुक्रवार) पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीचे वकिलपत्र वाजिद खान बिडकर यांनी घेतले.
पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीप्रमाणे, आरोपीचा गुन्हेगारी इतिहास असून त्याच्यावर यापूर्वीही चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने पीडितेवर दोन वेळा अत्याचार केलेत. मित्राच्या सूचनेनंतर पीडितेने तक्रार दाखल केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
स्वारगेट बस स्थानक हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) चे सर्वात मोठे बस डिपोंपैकी एक आहे. मंगळवारी (दि. 25) सकाळी साडेपाचच्या सुमारास पीडित महिला फलटण येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. त्यावेळी आरोपीने तिच्याशी संवाद साधला आणि “सताऱ्याची बस दुसऱ्या स्टँडवर उभी आहे,” असे सांगून तिला दिशाभूल केली. त्यानंतर, आरोपीने पीडितेला स्थानकातील रिकामी उभी असलेल्या शिवशाही एसी बसमध्ये नेले. बसच्या आतील दिवे बंद होते, त्यामुळे पीडितेला संशय आला. मात्र, आरोपीने तिला विश्वास दिला की हीच योग्य बस आहे. त्यानंतर आरोपीने जबरदस्ती करून तिच्यावर बलात्कार केला.





