कात्रज – “स्वच्छ पुणे, स्मार्ट पुणे’ घोषवाक्य महानगरपालिके तयार केले असून नागरिकांना स्वच्छतेचे धडे दिले जात असताना रस्त्याबाजूने व चौका-चौकांमध्ये विनापरवाना लागलेले फुकट लावण्यात येत असलेल्या फ्लेक्समुळे परिसरांचे विद्रूपीकरण होत आहे.
छोटे-मोठे व्यवसायिक, राजकीय वाढदिवसाच्या शुभेच्छा, नेमणूक अशा प्रकारचे फ्लेक्स, बोर्ड पुलांवर, दुभाजकाच्या मध्यभागी, पथदिवे अशा जागा मिळेल त्या ठिकाणी लावले जात असून
कात्रज, धनकवडी, बालाजीनगर तसेच स्वारगेट-सातारा रस्ता, श्री सद्गुरू शंकर महाराज उड्डाण पुलाचे विद्रुपीकरण करणाऱ्या फुकट्या जाहिरातदारांना आवरा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
उपनगरांमध्ये सर्वत्र संबंधीतांची फुकटात जाहिरात होत असली तरी उपनगरोच विद्रुपीकरण होत आहे. गणेशोत्सव, वाढदिवस, नेत्यांचे सोहळे (प्रसिद्धीचे डोहाळे) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत लावण्यात येणारे मोठे फ्लेक्स बोर्ड यावर महानगरपालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने सर्वच ठिकाणी “उंदड झाले फ्लेक्स्’ अशी स्थिती झाली आहे.
महानगरपालिकेच्या संभाव्य निवडणुकांमुळे तर याची प्रमाण तर वाढले आहे. इच्छुकांचे नवे कोरेकरकरीत चेहरे बॅनरवर झळकत आहेत. मात्र, अशा मानसिकतेमुळे उपनगर परिसर विद्रूप झाला आहे. अशा फुकट्या जाहिरातींबाबत नागरीकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
शिळ्या कढीला ऊत…
उपनगर परिसरात मागील काही दिवसांमध्ये विविध पक्षांचे नेत्यांचे दौरे झाले, त्यांच्या स्वागतासाठी तसेच उद्घाटनांच्या कार्यक्रमांचे फ्लेक्स लावण्यात आले होते. याशिवाय दहीहंडी उत्सव ते गणेशोत्सवाचे फ्लेक्स अद्यापही तसेच आहेत. याशिवाय महिनाभरापूर्वी होऊन गेलेल्या “युवा’ नेत्यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्सही उपनगरांची रया घालवत असून हा प्रकार म्हणजे “शिळ्या कढीला ऊत’ देण्यासारखा आहे.
याकडे महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे सर्रास दुर्लक्ष असल्याने कोणीही उठावे आणि फ्लेक्स् लावून जावे, असा कारभार सध्या सर्वत्र सुरू आहे, अशा फुकट्यांवर कारवाई कोणी करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जावू लागला आहे.
संबंधित सर्व परिसरात लावण्यात आलेले फ्लेक्स् व बोर्ड काढून घेण्याच्या सूचना आकाश चिन्ह विभागाला देण्यात आल्या असून कारवाईचे काम सुरू आहे. परिसरातील फ्लेक्स् तात्काळ काढण्यात येतील तसेच विनापरवानगी फ्लेक्स् लावल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
– प्रज्ञा पोद्दार, सहाय्यक आयुक्त,
धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय