पुणे – आईसोबत वाद आणि आपल्या प्रेमसंबंधास विरोध करणाऱ्या वडिलांचा प्रियकर आणि आईच्या साथीने अल्पवयीन मुलीने क्राइम वेबसिरीज पाहून कट रचत खून केला. पुणे-नगर रस्त्यावरील सणसवाडी परिसरात मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. यामुळे कोणताही पुरावा नसताना, केवळ सीसीव्हीच्या आधारे तपास करून शिक्रापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना गजाआड केले.
जॉन्सन कॅजीटन लोबो (वय 49, गुडविल वृंदावन आनंद पार्क वडगाव शेरी) यांच्या खून झाला असून याप्रकरणी पोलिसांनी पत्नी सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय43), मुलीचा प्रियकर ऍग्नेल जॉय कसबे (वय23, रा.साईकृपा सोसायटी,वडगावशेरी) या दोघांना अटक केली आहे, त्यांना न्यायालयाने 9 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुलीचे ऍग्नेल कसबे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून मयत जॉन्सन हा तिच्या आई सोबत सतत वाद घालत होता. याच वादातून तिघांनी मिळून जॉन्सन याच्या खुनाचा कट रचला. दि. 30 मे रोजी रात्री साडे अकरा वाजता घरात डोक्यात वरंवटा मारून आणि चाकूने वार करत जॉन्सनचा खून केला. दुसऱ्या दिवशी (31 मे) रात्रीपर्यंत मृतदेह तसाच घरात ठेवला. त्यानंतर रात्री चारचाकी गाडीतून सणसवाडी येथील नाल्यात टाकून मृतदेह पेट्रोल ओतून जाळला.
घरातून मृतदेह बाहेर काढता तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा धागा पोलिसांना तपासात महत्वाचा दुवा ठरला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, प्रमोद क्षिरसगार, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, महादेव शेलार, नितीन अतरे, उपनिरीक्षक अमोल खटावकर, गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, कर्मचारी जितेंद्र पानसरे, किशोर शिवनकर, अमोल दांडगे, निखील रावडे, विकास पाटील, शिवाजी चितारे, तुषार पंधारे, जनार्धन शेळके,योगेश नागरगोजे, राजू मोमीन यांनी केली.
..अन् गुन्ह्याचा छडा –
शिक्रापूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने फोन करून सांगितले की, नाल्यात एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत पडलेला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. मृतदेहाच्या अवस्थेवरून ओळख पटविणे अवघड होते. पोलिसांनी तब्बल चार दिवस अन् चार रात्री जागून 230 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी एक वॅगनआर गाडीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. ती गाडी वडगावशेरी येथील असल्याचे समजले. यावरून पोलिसांनी ऍग्नेल याचा पत्ता सोधून काढला. त्यातून जॉन्सन यांचा खून झाला असल्याचा छडा पोलिसांना लागला.