पुणे : लग्नाच्या आणाभाका एकीशी, साखरपुडा मात्र दुसरीशी!

पुणे – डॉक्टर तरुणीला “लग्न करतो’ असे सलग तीन वर्षे सांगत दुसरीबरोबर साखरपुडा करणाऱ्या तरुणावर अलंकार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीने विचारणा केल्यानंतर संशयिताने तरुणीची बनावट प्रोफाइल तयार करून त्यावर अश्लिल मॅसेज प्रसारित केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सुधांशु प्रदीपकुमार पारीख (37, रा. आदित्य रेसीडेन्सी, पिंपळे निलख) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 36 वर्षीय डॉक्टर तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधांशु आणि फिर्यादी तरुणीने मेट्रोमनी वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केले होते. त्यानुसार दोघांची 2016 मध्ये ओळख झाली. दोघांमध्ये लग्नाच्या अनुषंगाने 2019 दरम्यान व्यवस्थित बालेले सुरू होते.
परंतु, अचानक सुधांशुने दुसऱ्या तरुणीसोबत साखरपुडा केला. याची कुणकुण फिर्यादी तरुणीला लागल्यानंतर तिने सुधांशुकडे याबाबत विचारणा केली. या रागातून सुधांशु आणि त्याच्या आई-वडिलांनी तरुणीच्या क्लिनिकवर येऊन तिला शिविगाळ, फोन करून बदनामी केली. यादरम्यान फिर्यादीच्या नावाची बनावट प्रोफाईल तयार करून त्यावर अश्लिल पोस्ट प्रसारीत केल्या. आरोपीच्या या कृत्यामुळे अनोळखी लोकांनी तिला फोन करून अश्लिल संभाषण केले.





