पाकिस्तानमध्ये अनेक शहरात एकाचवेळी वीज खंडीत

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये शनिवारी एकाचवेळी वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानभर अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. वीज वितरण यंत्रणेमधील् दोषामुळे ही स्थिती निर्माण झली होती, असे पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे.
शनिवारी मध्यरात्रीनंतर लगेचच विजेचा पुरवठा खंडीत झाला होता. कराची, रावळपिंडी, लाहोर, इस्लामाबाद, मुलतान आणि अन्य शहरांमध्ये “‘ब्लॅक आऊट’सारखी स्थिती निर्माण झाली होती. “नॅशनल ट्रान्समिशन डिस्पॅच कंपनी’च्या वीजवाहक यंत्रणेत दोष निर्माण झाल्यामुळे हा वीज पुरवठा खंडीत झाला होत, असे इस्ल्माबादचे डेप्युटी कमिशनर हमझा शफकात यांनी सांगितले. ही स्थिती सुरळीत होण्यासाठी काही तासांचा अवधी लागू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
वीज खंडीत होण्यामुळे वीज वितरण सिस्टीममधील फ्रिक्वेन्सी 50 वरून 0 झाली असल्याचे उर्जा मंत्री ओमर आयुब खान यांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार रात्री 11.41 वाजता सिंध प्रांतातील गुड्डू पॉवर प्लांटमध्ये दोष निर्माण झाल्याचे ऊर्जा मंत्रालयाने ट्विट केले. हा तांत्रिक दोष दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात असून नागरिकांनी संयम राखावा, असे आवहन खान यांनी केले आहे. रविवारी दुपारनंतर काही शहरांमधील वीज पुरवठा सुरू झाला.





