पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मधून देशवासीयांशी साधला ‘संवाद’; शेतकरी निदर्शनांबाबत म्हणाले…

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण साधणारे कायदे आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज “मन की बात’ या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी देशवासीयांशी संवाद साधला. या कायद्याचा वापर करून राज्यातल्या धुळे जिल्ह्यातले शेतकरी जितेंद्र भोई यांना व्यापाऱ्याकडून थकबाकी कशी मिळवता आली, याचा उल्लेखही मोदी यांनी केला.
शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत असलेले राज्यस्थानमधले मोहम्मद अस्लम आणि सुगीनंतर शेतात उरलेल्या काडी कचऱ्यातून आर्थिक संधी निर्माण करणारे हरयाणातले शेतकरी विरेंद्र यादव यांच्या अभिनव उपक्रमांची माहिती देशवासीयांना दिली.
सांस्कृतिक वारसा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणे आणि या वारस्याच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणे महत्वाचे आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातल्या अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल पद्धतीने जतन करण्याचे काम सुरू करणार आहे. देशातली अनेक वस्तुसंग्राहलये आणि ऐतिहासिक वास्तुंचे डिजीटायझेशन केले जात आहे. परदेशातल्या अशा काही प्रयत्नांचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला.
संकटावर मात करण्यासाठी संस्कृती महत्वाची भूमिका बजावते. भारतातून साधारण शंभर वर्षापूर्वी परदेशात चोरून नेलेली देवी अन्नपुर्णेची मुर्ती पुन्हा भारतात आणली जात आहे. या कामी कॅनडा सरकार आणि इतरांनी मदत केल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
भारतीय संस्कृतीकडे आकर्षित होऊन वेदांच्या प्रसारासाठी कार्य करत असलेल्या ब्राझीलमधल्या जॉनस मस्सेट्टी आणि न्युझीलंडमध्ये नुकत्याच झालेल्या निवडूनकीत निवडून आलेले डॉक्टर गौरव शर्मा यांनी संस्कृतमधे शपथ घेतल्याचेही पंतप्रधानांनी आवर्जुन सांगितले.
देशातले महान पक्षीनिरीक्षक सलीम अली यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त सलीम अली यांच्या कार्यकतृत्वाला त्यांनी उजाळा दिला. येत्या 30 नोव्हेंबरला श्री गुरू नानक देव जी यांचे 551 वे प्रकाश पर्व साजरे केले जाणार आहे. तसेच येत्या 5 डिसेंबरला श्री अरबिंदो यांची पुण्यतिथी आहे. या दोन्ही घटनांचा उल्लेख करून मोदी यांनी त्यांना अभिवादन केले.
अरबिंदो यांचे हे विचार म्हणजेच आत्मनिर्भर भारत आणि “व्होकल फॉर लोकल’ या मंत्राचा मतितार्थ आहे असे मोदी म्हणाले. येत्या 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे, या दिवशी देशाविषयीचे आपले संकल्प आणि संविधानाने नागरिक म्हणून आपल्याला दिलेली कर्तव्य पूर्ण करायच्या शिकवणीचे स्मरण करावे असे आवाहन त्यांनी केले.
करोनाविरोधातील लढ्याची आठवण…
करोनाचा पहिला रुग्ण सापडल्याला वर्ष होऊन गेल्यावर आज करोना विरोधातल्या लसीची चर्चा होत असली, तरी हा लढा संपलेला नाही याची आठवण मोदी यांनी करून दिली. करोनाविरुद्धचा कोणताही निष्काळजीपणा घातकच आहे, असे सांगून, त्याविरुद्धचा लढा कायम ठेवायचा आहे, असे आवाहन त्यांनी केले.
शैक्षणिक संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटना महत्वाच्या असतात असे सांगून, त्यांनी अशा अनेक संघटनांच्या कामाचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला. माजी विद्यार्थ्यांनी आपण ज्या संस्थांमधून शिक्षण पूर्ण केले आहे, त्यांच्याशी जोडलेले रहावे तसेच शिक्षण संस्थांनीही माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे आवाहन त्यांनी केले.





