परभणीत तणावपूर्ण शांतता! पंचनामे सुरू; 41 पुरुष, 9 महिलांसह 50 जणांना अटक

परभणी – भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणीत मोठी दंगल उसळली होती. त्यात जाळपोळ व दगडफेक झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 8 गुन्ह्यांची नोंद करून 50 जणांना अटक केली आहे. पोलिसांवर या प्रकरणी रात्रीच्या वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवल्याचा आरोप होत आहे. पण नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमाप यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची दोन दिवसांपूर्वी एका माथेफिरूने तोडफोड केली होती. या घटनेविरोधात आंबेडकरी संघटनांनी बुधवारी बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण मिळाले होते. यामुळे पोलिसांनी जमावावर अंकुश मिळवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करत जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद आदी उपाययोजना केली होती. तसेच मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशनही राबवले होते. त्यात आता अनेक तरुणांना जबर मारहाण केल्याचा आरोप आहे.
नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी गुरुवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत रात्रीच्यावेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवल्याचा आरोप धुडकावून लावला. ते म्हणाले, शहरात आता शांतता आहे. पोलिसांनी या प्रकरणी 8 गुन्हे दाखल करून 50 जणांवर अटकेची कारवाई केली आहे. त्यात 41 पुरुष व 9 महिलांचा समावेश आहे.
प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवताना धरपकड केली. पण रात्रीच्या वेळी कोणतेही कोम्बिंग ऑपरेशन केले नाही. प्रस्तुत घटनेत 9 पोलिस किरकोळ जखमी झालेत. या प्रकरणी सोशल मीडियावरील व्हिडिओ व सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कारवाई केली जात आहे.
ते पुढे म्हणाले, परभणीत सुरक्षेसाठी फिक्स पॉइंट व एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी व्यापाऱ्यांशी चर्चा करत आहेत. घटना विविध ठिकाणी घडल्यामुळे विलंब झाला, पण आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
दुसरीकडे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणीच्या जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. तसेच या घटनेत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार आजपासून मनपा व तहसीलदारांकडून पचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे.




