नेवासा: सुपारी घेवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन सराईतांच्या आवळल्या मुसक्या

नेवासा – नेवासा फाटा येथे अपघाताचा बनाव करत सुपारी घेवून एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो जीप वाहनाची धडक देवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन खुनाचा कट रचल्याप्रकरणी अहमदनगर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आणखी काही या गुन्ह्यातील मास्टरमाईंड गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत. पकडलेल्या आरोपींनी सुपारी देवून गुन्हा घडवून आणला असल्याची माहीती गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना दिली. आरोपी गजाआड करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, श्रृती सौरभ पोखरकर (रा.बालेवाडी, स्टेडीयमजवळ,म्हाळुंगे,ता.जि. पुणे) यांचा चुलत भाऊ शंतनु पोपट वाघ हा त्याच्याकडील शाईन मोटारसायकलवरुन त्यांच्या घरीहून खडका फाटा येथील त्यांच्या खडीक्रेशवर जात असतांना शुक्रवार (दि.१६) ऑगस्ट रोजी पांढऱ्या रंगाच्या एका बोलेरो गाडीमधील आरोपीने कट कारस्थान करुन त्याचा पाठलाग केला. बोलेरो गाडीने त्याच्या शाईन मोटारसायकलला जोराची धडक दिली. जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न नसल्यामुळे व सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर गुन्ह्याच्या तपास हा स्थानिक गुन्हे शाखाकडे वर्ग करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी आदेश दिलेले होते.
त्यामुळे या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करुन घटना ठिकाणी भेट देवून तसेच जखमीचे घरापासुन ते घटना ठिकाणापर्यंतचे सर्व सी.सी.टी.व्ही.छायाचित्राची पाहणी केली. त्यामध्ये जखमीचे मोटारसायकलचा एका पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी पाठलाग करतांना तपाची अधिकाऱ्यांना दिसून आले. या बोलेरो गाडीवरुन आरोपींचा शोध पोलीस घेत असतांना तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन आरोपी शिवनाथ ज्ञानदेव चावरे (वय ४१ रा.जळके खुर्द,ता. नेवासा) , ज्ञानदेव उर्फ नारायण सुर्यभान लष्करे (वय ४२ वर्षे रा.पावन गणपती मंदीरासमोर,नेवासा) संदीप साहेबराव धनवडे (वय ३९ वर्षे, रा.भेंडा खुर्द,ता.नेवासा) यांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.
आरोपींकडे गुन्ह्याचे कारणाबाबत सखोल व बारकाईने तपास करता आरोपी शिवनाथ चावरे याच्या भाचीचे सन २०२२ मध्ये जखमी शंतनु पोपट वाघ (रा.नेवासा खुर्द,ता.नेवासा,जि.अहमदनगर) याच्या सोबत लग्न झालेले होते. मागील एका वर्षापुर्वी शिवनाथ चावरे याच्या भाचीने गळफास घेवून आत्महत्या केलेली असुन त्या द्वेषातुन आरोपी शिवनाथ चावरे याने गुन्ह्याचा कट रचुन पोलीस रेकॉर्डवरील आरोपी ज्ञानदेव उर्फ नारायण सुर्यभान लष्करे, संदीप साहेबराव धनवडे व त्यांचे इतर साथीदारांना सुपारी देवून गुन्हा घडवुन आणला असल्याची माहीती गुन्हे शाखेच्या पोलीसांना दिली.
त्यामुळे या गुन्ह्यात सहभागी असणारे आरोपी ज्ञानदेव उर्फ नारायण सुर्यभान लष्करे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याच्या विरुध्द खुनाचा प्रयत्न, दंगा करणे असे एकुण चार, तर आरोपी संदीप साहेबराव धनवडे याच्या विरुध्द जबरी चोरी, दंगा करणे असे दोन गुन्हे दाखल आहेत. वरील आरोपींना पोलीसांनी अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक तुषार धाकराव हे करीत असुन आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी दिली आहे.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अतुल लोटके, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, संदीप दरंदले, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे यांच्या पथकाने केला आहे.





