Newasa News : नगराध्यक्षांचा प्रताप; नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे टॅंकर बांधकामासाठी वापरल्याचा आरोप
Newasa News : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Newasa News : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या काही नगरसेवकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व छायाचित्रे प्रसारित करून नगरपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा वापर नागरिकांसाठी न करता नेवासा फाटा येथील एका बांधकामासाठी होत असल्याचा दावा केला आहे.
शहरात सात ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत नगरपंचायतीच्या ट्रॅक्टरद्वारे फिल्टर प्लांटमधून पाणी भरून संबंधित बांधकामावर मागील सहा दिवसांपासून पाणी मारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे. मात्र, सोशल मीडियावरील आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसून नगराध्यक्ष व प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





