नेवासा नगरपंचायत निवडणुकीचे पडघम: नेत्यांना फुटला माणुसकीचा ‘पाझर’

नेवासा (राजेंद्र वाघमारे): नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, सर्वपक्षीय नेतेमंडळींनी प्रभागातील समस्यांचा आढावा घेत अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. एरव्ही नगरपंचायत कार्यालयाकडे ढुंकूनही न पाहणारे नेते आता जनतेच्या समस्यांबाबत जागरूक झाले असून, काहींनी आंदोलनाचा इशारा देत ‘खरे कैवारी’ असल्याचा दावा केला आहे.
निवडणुकीची चाहूल लागताच इच्छुक नेत्यांना माणुसकीचा ‘पाझर’ फुटला आहे. चौकाचौकात ‘नमस्कार-चमत्कार’ सुरू झाले असून, चहा-पानाच्या गप्पांतून भावनिक संवाद साधला जात आहे. प्रभागातील राजकीय वातावरणाचा अंदाज घेताना जनाधार असलेल्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नेत्यांचे बारीक लक्ष आहे. बड्या कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्याचे ‘शब्द’ देण्यात नेते गुंतले आहेत.
प्रभागातील मतदार आणि कार्यकर्त्यांच्या हालचालींकडे इच्छुकांचे लक्ष लागले असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी माणुसकीचा प्रदर्शन सुरू आहे. निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्वसामान्य जनतेलाही ‘चातक’ पक्ष्याप्रमाणे निवडणुकीची खात्री पटली आहे. राजकीय रणधुमाळी तीव्र होत असल्याने नेवासा शहरात निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली आहे.



