Newasa News : नेवासे तालुक्यात अल्पावधीतच सर्वसामान्यांचा आमदार म्हणून ख्याती मिळवणारे विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. “हात दाखवा आणि गाडी थांबवा” अशी त्यांची स्वतःची खास शैली असून, गोरगरीबांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेट रस्त्यावर त्यांच्या समस्या ऐकून घेण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. यामुळे नेवासा तालुक्यात त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. शुक्रवारी (दि. २०) दुपारी चार वाजता नेवासे येथे दौऱ्यावर आलेले आमदार लंघे-पाटील गणपती चौकातून जात असताना त्यांची गाडी दिसताच कार्यकर्त्यांनी हात दाखवून थांबवली. त्यानंतर ते थेट प्रसिद्ध रोडागिरी चहाच्या टपरीसमोर एका बाकड्यावर बसले आणि चक्क चहाचा आस्वाद घेतला. तेथे बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांशी हसतखेळत गप्पा मारल्या. या अनपेक्षित आणि साध्या घटनेमुळे नेवासकरांना आमदारांनी एक सुखद आश्चर्याचा धक्का दिला. हे दृश्य पाहून स्थानिकांना आपला आमदार खरोखरच ‘आपला माणूस’ असल्याची भावना अधिक दृढ झाली. आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांना भेटण्यासाठी कोणत्याही वशिल्याची किंवा स्वीय सहायकांची गरज भासत नाही. कोणीही थेट फोन करून आपली व्यथा मांडू शकतो. कामगार ते तलाठी, किंवा थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या समस्या सांगून नागरिक मोकळे होतात. आमदार स्वतः झटपट फोन करून या समस्या सोडवतात. यामुळे नेवासा तालुक्यात ते ‘हक्काचा माणूस’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही नेत्याचा कार्यकर्ता असला तरी आमदार लंघे-पाटील त्याच्या पक्षाची चौकशी न करता कामाची सोडवणूक करतात. त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्ते आता त्यांच्याकडे काम घेऊन येतात आणि तेही सहज सोडवले जातात. शुक्रवारीच आमदार लंघे-पाटील नेवासे पंचायत समितीमध्ये बैठक घेण्यासाठी जात असताना संतोष चांदणे यांच्या प्रसिद्ध रोडागिरी चहाच्या टपरीवर आपा बेद्रे, पत्रकार राजेंद्र वाघमारे, गणेश चौगुले, मनोज गावडे हे बसलेले होते. त्यांनी हात दाखवताच आमदारांची गाडी रस्त्याच्या बाजूला थांबली आणि ते धडक टपरीवर येऊन चहा घेत कार्यकर्त्यांशी गप्पा मारल्या. या साध्या पण प्रभावी कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य नेवासकरांना आपला आमदार खरोखरच त्यांच्यासाठी असल्याची भावना पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.