Ner Lake Water Protest: नेर तलावातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पुसेगावात शिवसेनेचा रास्ता रोको
Ner Lake Water Protest: यावेळी आंदोलकांनी तात्काळ नेर तलावातून येरळा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

Ner Lake Water Protest: पुसेगाव- नेर तलावातून येरळा नदीत पाणी सोडले जात नसल्याच्या निषेधार्थ पुसेगाव येथे शिवसेनेच्या वतीने आज सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी आक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप जाधव यांनी केले.
यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. ‘शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ करू नका’, ‘तत्काळ पाणी सोडा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
प्रताप जाधव यांनी यावेळी प्रशासन व लोकप्रतिनिधींवर तीव्र टीका केली. “श्रेय घेणे, पाणीपूजन करणे आणि सत्तेचा उपभोग घेणे सोपे आहे; मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरत आहेत. मतदारसंघात दोन आमदार असूनही शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “जिहे-कटापूर योजनेमुळे खटाव तालुक्याला मोठा लाभ झाला आणि बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले; मात्र सध्याच्या श्रेयवादाच्या राजकारणात येरळा नदी कोरडी पडली आहे. सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र पाण्याअभावी करपून गेले आहे. परिसरात पाणी उपलब्ध असतानाही ते नदीत सोडले जात नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.”
यावेळी आंदोलकांनी तात्काळ नेर तलावातून येरळा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.





