नगरपंचायतच्या विजयानंतर रोहित पवारांना मंत्रिपद मिळण्याची कार्यकर्त्यांची इच्छा

कर्जत – 2019ला कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवार आमदार म्हणून निवडून आले. कर्जत नगर पंचायतीत राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नव्हता, नगर पंचायत भाजपच्या ताब्यात होती. रोहित पवारांनी यावेळी ही नगर पंचायत आपल्याकडे खेचून आणली आणि एकूण 17 जागांपैकी तब्बल 15 जागांवर विजय मिळवण्यात त्यांना यश आलं. 2019 च्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत कर्जत शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 44 टक्के मते मिळाली होती. तर भाजपला 51 टक्के मते मिळाली होती.
परंतु 2022 च्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीवेळी हे चित्र संपूर्ण पालटलं असून या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तब्बल 61 टक्के मते मिळाली असून भाजपला 34 टक्के मतांवर समाधान मानावे लागले आहे. या विजयानंतर आमदार रोहित पवार यांना मंत्रीपद किंवा राज्यापातळीवरील मोठी जबाबदारी देण्यात यावी अशी कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
2017 साली पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून रोहित पवारांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर 2019 साली ते आमदार म्हणून निवडून आले. कामाच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच जनतेच्या मनात घर केलं. त्यासोबतच त्यांचा युवा चाहता वर्ग मोठा आहे. गेल्या 2 वर्षात त्यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले. तसेच अनेक प्रश्नांना वाचा फोडली. त्यामुळेच गेल्या 25 वर्षांपासून भाजपकडे असलेल्या कर्जत शहराच्या गढीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावण्यात रोहित पवारांना यश आलं आहे.
मध्यंतरी रोहित पवार यांच्या मंत्रिपदाबाबत चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी रोहित पवारांना मंत्रिपद मिळावं, अशी इच्छाही व्यक्त केली होती. त्यातच भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करून आधी विधानसभा आणि आता नगर पंचायत खेचून आणल्याने रोहित पवारांनी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून पक्षाने रोहित पवारांना मंत्रिपद किंवा राज्य पातळीवर मोठी जबाबदारी सोपवावी अशी अपेक्षा कार्यकर्ते करत आहेत.




