“मला गद्दार म्हणताय? होय, मी गद्दारी केली कारण..” – आमदार बच्चू कडू

येवला – मला गद्दार म्हणताय? होय, मी गद्दारी केली ती केवळ दिव्यांगांसाठी. यामुळे देशातीलच नव्हे, तर जगातील पहिल्या अपंग- दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती झाली. माझी गद्दारी जनतेसोबत नसून, दीव्यांग व शेतकरी हितासाठी आहे, असे प्रतिपादन प्रहार शेतकरी संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी केले.
पाटोदा येथे संघटनेतर्फे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात श्री. कडू यांच्या मातोश्री स्व. इंदिराबाई कडू यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला राज्यस्तरीय प्रहाररत्न पुरस्कार येथील माजी सभापती प्रवीण गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. यासह शेतकरी, सर्वसामान्य व आदिवासी बांधवांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेळाव्यात रक्तदान शिबिर, तसेच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या बियाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मधमाशी पालन प्रशिक्षणाची नाव नोंदणीही या वेळी करण्यात आली. संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके, जिल्हाप्रमुख शरद शिंदे, अरुण ठाकरे, उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर, प्रवीण गायकवाड आदी प्रमुख पाहुणे होते.





