‘मनोज जरांगेंनी विधानसभा लढवावी, त्यांना 60-70 जागा मिळतील’; राज्यातील ‘या’ बड्या नेत्याचं विधान चर्चेत

MLA Bacchu Kadu । manoj jarange । Maratha Reservation – मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी गुरुवारी आपले उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी आंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली.
यावेळी दोघांत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर जरांगेंनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला 1 महिन्याची मुदत दिली असल्याचे जरांगे यांनी उपोषण मागे घेताना सांगितले. सहाव्या दिवशी त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी जरांगे उपोषणाला बसले होते. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषण स्थळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला वेळ द्या, अशी मागणी करत मराठा समाजाला सरकार आरक्षण देणारच आहे, असे सांगितले.
तसेच आधी तुमच्या तब्बेतीची काळजी घ्या आणि उपोषण मागे घ्या, अशी विनंती मंत्री शंभुराज देसाई यांनी जरांगेंना केली. 30 जूनपर्यंत निर्णय घेण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र, सरकारच्या विनंतीनुसार आता सरकारला 13 जुलैपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.
तर, दुसरीकडे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. मनोज जरांगे यांचे 60-70 जागा विधानसभेला जिंकून येतील, असा विश्वास बच्चू कडू यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत आज प्रहार संघटनेची महत्त्वाची बैठक होतेय. या बैठकीमध्ये प्रहार संघटना मोठा निर्णय घेणार आहे.
महायुतीसोबत राहयचं की नाही? याचा फैसला प्रहार संघटनेकडून आज करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मला सरकार मंत्रिपद देणार नाही आणि सरकारने दिलं तरी मी मंत्रिपद घेणार नाही, असंही मोठं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. पुढे बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे.
ते म्हणाले, ‘मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करण्यासारखा आत्मघातकी निर्णय घेऊ नये. जरांगे आहेत तर समाज आहे. त्यांनी उपोषण न करता दुसरा पर्याय निवडावा. त्यांनी विधानसभा लढवावी आणि लढवली तर 60-70 जागा त्यांना मिळतील असं चित्र महाराष्ट्रात असल्याचे बच्चू कडूंनी म्हटलं. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.





