Satara | दिव्यांगांच्या हाकेला धावणारा आमचा प्रहार पक्ष

वडूज, (प्रतिनिधी) – रयत आधार सोशल फाउंडेशन व प्रहार जनशक्ती यांच्या संयुक्तरित्या कातरखटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रांगणात दिव्यांग मेळावा संपन्न झाला. त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आ. बच्चु कडू यांनी “जिसका कोई नही, उसका प्रहार है यारो, असे सांगत अन्याय घडल्यास कधीही हाक मारा, मी तुमच्या पाठीशी उभा राहीन, अशी ग्वाही दिले.
यावेळी रयत आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मकरंद बोडके, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. इन्नुस शेख, मंडलाधिकारी हिम्मत बाबर, कातरखटावच्या संरपंच कांचन बागल, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे, खटाव तालुकाध्यक्ष अक्षय ननावरे, प्रमोद तावडे, सुनील तावरे, वैद्यकिय अधिकारी सुशील तुरुकमाने, माजी सरपंच तानाजीशेठ बागल, भारतीय स्टेट बॅन्केचे शाखाधिकारी सुरज कुंभार, वडूज नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
बच्चु कडू म्हणाले, आमचा पक्ष हा दिव्यांगासाठी लढतो आहे. दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे. आम्ही कोणत्याही जातीच्या नावाने लढत नाही तर दिव्यांग हीच आमची जात आहे, दिव्यांग हेच माझे विठ्ठल आहेत. ब-याच व्यक्तींना हात नाहीत, पाय नाहीत, डोळे नाहीत, एैकू येत नाही अशा दिव्यांगांनी जीवन जगताना कोणतीही हार मानली नाही, जगण्याची आशा सोडलेली नाही. अशा दिव्यांगांच्या हाकेला धावणारा आमचा प्रहार पक्ष आहे.
राज्यातील दिव्यांगांना सध्या मिळणारी पंधराशे रुपयांची पेन्शन ही पुरेसी नाही. सरकारकडून ही पेन्शन सहा हजार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दिव्यांगांना दरवर्षी द्यावा लागाणा-या उत्पन्नाच्या दाखल्याची अट आम्ही काढून टाकली असल्याचे बच्चु कडू यांनी सांगितले.
यावेळी जमलेल्या सर्व दिव्यांगांच्या ते बसलेल्या ठिकाणी जावून व्यथा जाणून घेतल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून दिव्यांगांच्या शुगर, बीपी व इतर तपासण्या मोफत करण्यात आल्या, शासकीय सेवेतील दिव्यांग व्यक्तींना जीवन गौरव पुरस्काराच्या माध्यमातून शाल व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
रयत आधार या संस्थेकडून काही दिव्यांगांना अपंग सायकलचे वाटप करण्यात आले. भारतीय स्टेट बॅन्केकडून दिव्यांगांची मोफत खाती उघण्यात आली. शिवम डोंबे यांनी सुत्रसंचालन केले. प्रकाश काशिद यांनी आभार मानले.
यावेळी सुहास आलुरे, अजय तुपे, वसंत बागल, नितीन शिंगाडे, दत्ताशेठ बागल आदी मान्यवर उपस्थित होते.





