Leopard In Phulgaon : फुलगावात बिबट्याचे दर्शन; खुळे वस्ती परिसरात भीतीचे वातावरण
Leopard In Phulgaon : हवेली तालुक्यातील फुलगाव येथील खुळे वस्ती परिसरात सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leopard In Phulgaon : हवेली तालुक्यातील फुलगाव येथील खुळे वस्ती परिसरात सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फुलगाव-तुळापूर मार्गावरून जात असलेल्या काही स्थानिक नागरिकांनी वाहनातून बिबट्याला पाहिले असून त्याचे छायाचित्रही टिपले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधार पडल्यानंतर खुळे वस्ती परिसरातील रस्त्यावर अचानक बिबट्या दिसून आला. काही काळ तो परिसरात वावरत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बिबट्याचे दर्शन होताच वाहनचालकांनी सावधगिरी बाळगत सुरक्षित अंतर राखून मार्गक्रमण केले. या घटनेची माहिती अल्पावधीतच परिसरात पसरल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
फुलगाव परिसरात शेती, मानवी वस्ती तसेच झाडीचे प्रमाण अधिक असल्याने वन्यप्राण्यांचा अधूनमधून वावर होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. बिबट्याच्या हालचालीमुळे शेतकरी, शेतमजूर तसेच सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, आवश्यक ती उपाययोजना करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
‘वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून गस्त वाढवावी’
“खुळे वस्ती परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात शेतकरी, महिला आणि लहान मुलांची सतत ये-जा असते. त्यामुळे वनविभागाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ पिंजरा लावावा, परिसरात गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करून बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण आणावे.” — राहुल नंदाराम वागस्कर, माजी उपसरपंच, फुलगाव




