Lawyer Election Result : पुणे, गोवा वकील परिषद निवडणूकीत पुण्याचा दबदबा; 23 पैकी तब्बल 8 उमेदवार विजयी
Lawyer Election Result : राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे, गोवा वकील परिषदेच्या निवडणूकीत पुणे जिल्ह्याने दबदबा निर्माण केला आहे. २३ पैकी ८ उमेदवार विजयी झाले आहे.

Lawyer Election Result : राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे, गोवा वकील परिषदेच्या निवडणूकीत पुणे जिल्ह्याने दबदबा निर्माण केला आहे. २३ पैकी ८ उमेदवार विजयी झाले आहे. ८ मध्ये ६ जण सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहेत. तर महिला राखीव गटातून २ उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे राज्यात दुसरा आणि तिसरा क्रमांक पुण्यातील उमेदवारानेच पटकाविला आहे. नागपूर येथील पारिजात पांडे राज्यात पहिल्या क्रमांकाने निवडून आले आहेत.
जिल्ह्यातील उमेदवारांपैकी गणेश शिरसाठ सर्वाधिक मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. त्यानंतर राजेंद्र उमाप हे जिल्ह्यातून दुसऱ्या आणि राज्यातून तिसऱ्या क्रमांकाची मते घेऊन विजयी झाले आहेत. उमाप हे मागील वेळी पण विजयी झाले होते. त्यांनी परिषदचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
त्याखालोखाल विठ्ठल कोंडे देशमुख विजयी झाले आहेत. देशमुख यांनी निवडणूकीसाठी मुंबई येथून अर्ज भरला असला, तरीही ते मुळचे खेड शिवापूरचे आहेत. त्यामुळे त्यांना पुण्यातील उमेदवारच समजले जाते. त्यानंतर राजेंद्र अनभुले, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विकास ढगे पाटील, अहमदखान पठाण हे जिल्ह्यातून विजयी झाले आहेत. तर महिला राखीव गटातून रंजना भोसले आणि माधवी पोतदार विजयी झाले आहेत.
या निवडणूकीसाठी महाराष्ट्र, गोवा, दादर नगर हवेली आणि दमण दीव येथील मिळून १५५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. त्यापैकी २५ उमेदवार पुणे जिल्ह्यात होते. त्यातून ८ जण विजयी झाले आहेत. मागील वेळी ही संख्या ५ होती. मात्र, यंदा पहिल्यांदाच महिलांना आरक्षण देण्यात आले आहे. २५ ऐवजी २३ जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये १८ जण सर्वसाधारण गटातून विजयी झाले आहेत.
यात पुणे जिल्ह्यातील ६ जणांचा समावेश आहे. तर ५ महिला राखीव गटातून उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यामध्ये पुण्यातील दोन महिलांचा समावेश आहे. निवडणूकीनंतर दोन महिलांची निवड स्विकृत पध्दतीने होणार आहे. परिषेदासाठी एकुण १ लाख ९० हजार ते १ लाख ९५ हजार वकील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील २४ ते २५ हजार मतदारांचा समावेश आहे.





