Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल प्रकरणाला धक्कादायक नवं वळण; खळबळजनक माहिती समोर
Ketan Agrawal Case : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पोलिस तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले असून, लोहगड किल्ल्यावरील सुरक्षारक्षकाच्या साक्षीमुळे या प्रकरणातील संशय अधिक गडद झाला आहे.

Ketan Agrawal Case : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पोलिस तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले असून, लोहगड किल्ल्यावरील सुरक्षारक्षकाच्या साक्षीमुळे या प्रकरणातील संशय अधिक गडद झाला आहे. केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी किल्ल्यावर प्रवेशावेळी तिकीट न काढण्याचा प्रयत्न केल्याची बाब तपासात समोर आली आहे.
लोहगड किल्ल्यावरील सुरक्षारक्षक धीरज जाधव यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात, सिया गोयलला प्रवेशासाठी तिकीट काढण्यास सांगितले असता तिने मोबाईलला नेटवर्क नसल्याचे कारण दिल्याचे म्हटले आहे. त्यानंतर काही वेळाने तेथे आलेल्या चेतन चौधरीलाही तिकीट घेण्यास सांगण्यात आले. मात्र, “मी व्यायामासाठी आलो असून परत जाताना पैसे देतो,” असे सांगत त्याने तेथून काढता पाय घेतल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे. पोलिसांच्या मते, ही साक्ष तपासासाठी महत्त्वाची ठरत आहे.
दरम्यान, सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणात आता हत्येचा संशय बळावला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर), लोकेशन डेटा आणि प्रत्यक्ष साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढवली आहे.
हुडी घातलेल्या तरुणामुळे संशय बळावला –
तपासादरम्यान १८ जूनच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करताना पोलिसांच्या नजरेस हुडी आणि कॅप घातलेला एक तरुण आढळला. सुमारे ३३ अंश सेल्सिअस तापमान असताना संबंधित व्यक्तीने हुडी परिधान केल्याने पोलिसांचा संशय वाढला. फुटेजमध्ये हा तरुण केतन आणि सियाला पाहताच थांबल्याचे तसेच हातवारे करताना दिसत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. सियानेही त्यास प्रतिसाद दिल्याचे फुटेजमध्ये दिसून आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केतनचा स्वभाव तपासासाठी ठरला महत्त्वाचा –
पोलिसांनी केतनच्या कुटुंबीयांची सखोल चौकशी केली असता, तो अत्यंत सावध स्वभावाचा असल्याची माहिती समोर आली. ट्रेकिंगदरम्यानही तो इतरांपासून काही अंतर राखून चालत असे. तसेच, धोकादायक ठिकाणी जाणे किंवा अनावश्यक जोखीम पत्करणे तो टाळत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. याच आधारे केतन स्वतःहून दरीच्या काठावर गेला असण्याची शक्यता कमी असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
१८ दिवसांत तीन वेळा लोहगड भेट –
केतनने अवघ्या १८ दिवसांत तीन वेळा लोहगड किल्ल्याला भेट दिल्यानेही पोलिसांचा संशय वाढला आहे. ४ जून रोजी कुटुंबीयांनी परवानगी नाकारल्यानंतर सियाने वाद घातल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर १४ जून रोजी दोघे किल्ल्यावर गेले होते. तसेच, १८ जून रोजी सियाच्या मित्राने “सरप्राइज प्लॅन” केल्याचे केतनने आईला सांगितले होते.
नियोजनबद्ध कटाचा संशय –
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, किल्ल्यावर पोहोचल्यानंतर सियाने थकल्याचे सांगून बसण्याचा बहाणा करायचा आणि त्यानंतर चेतनने पुढील कारवाई करायची, असा कथित कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरोपांनुसार, सिया बसल्यानंतर केतनही थांबला आणि त्याचवेळी त्याला दरीत ढकलण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.
पोलिसांकडून सध्या सर्व तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांची कसून तपासणी सुरू असून, अंतिम तपास अहवालानंतरच या प्रकरणातील सत्य स्पष्ट होणार आहे. मात्र, सुरक्षारक्षकाची साक्ष आणि सीसीटीव्ही फुटेजमधील संशयास्पद हालचालींमुळे हे प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
दरम्यान, पोलिस तपासात समोर आले की, नोव्हेंबरमध्ये होणारे हे लग्न सियाच्या मनाविरुद्ध होते, कारण तिचे चेतनवर प्रेम होते. कुटुंबाच्या बदनामीच्या भीतीने लग्नाआधी पळून जाण्याऐवजी तिने थेट केतनचा काटा काढण्याचा क्रूर निर्णय घेतला. पुणे पोलीस आता मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.





