आपटेचे वकील म्हणाले – ‘…म्हणून जयदीप आपटेने शरणागती पत्करली’

ठाणे – मालवण राजकोट किल्ल्यांवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना मालवण न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती. आपटेचे वकील गणेश सोवनी यांनी सांगितले की, राज्यातील घाणेरड्या राजकारणाचा तिटकारा आल्यामुळे जयदीप आपटेने शरणागती पत्करली.
वकील गणेश सोवनी म्हणाले, जयदीप आपटेविरोधात केलेले आरोप चुकीचे आहेत. बुधवारी आपटेने त्याच्या पत्नीशी चर्चा केली आणि त्यानंतर शरण जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मात्र त्याला गुप्त माहितीच्या आधारे अटक केल्याचे सांगितले आहे.
तसेच पुतळा कोसळल्यानंतर जनक्षोभ उसळलेला पाहून शिल्पकार आपटेवर नको असलेली कलमेही दाखल करण्यात आली आहेत. पुतळा कोसळून जीवाला धोका निर्माण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण पुतळा कोसळला तेव्हा कोणत्याही पर्यटकाला इजा झालेली नाही. तसेच तज्ज्ञ समितीचा अहवाल येण्याआधीच घाईने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत.
तांत्रिक सल्लागार चेतन पाटीलने मागच्या आठवड्यात कोल्हापूर येथे शरणागती पत्करली होती. कंत्राट मिळाल्यानंतर बांधकाम पूर्ण करण्यासाठी किती दिवसांचा कालावधी दिला होता, त्यानंतर किती वेळात बांधकाम पूर्ण केले, काम लवकर पूर्ण करण्यासाठी कुणाचा दबाव होता का आणि या कंत्राटाचे अर्थकारण काय? याबाबतचे प्रश्न चेतन पाटीलला विचारण्यात येणार आहे.




