Jaydeep Apte : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेला जामीन मंजूर

मालवण : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आता आपटेला कोठडीत ठेवण्याची गरज नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नसल्यामुळे हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम याप्रकरणी लागू शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. मालवण येथे राजकोट किल्ला परिसरात शिवरायांचा पुतळा 26 ऑगस्ट 2024 मध्ये कोसळला होता. अवघ्या आठ महिन्यांतच पुतळा कोसळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत होता. या घटनेनंतर पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट असल्याचे उघड झाले होते.
पुतळा दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण येथून अटक करण्यात आली होती. पुतळा कोसळल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यातील चेतन पाटील या आरोपीला उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच जामीन मंजूर केला होता.
काय आहे नेमके प्रकरण?
मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुर्णाकृती पुतळ्याच अनावरण झालं होतं. पुतळा उभा राहिल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळला. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं.





