Jalgaon Train Accident: आगीच्या अफवेने केला घात; जळगावमध्ये भीषण रेल्वे दुर्घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू

Jalgaon Train Accident: मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसच्या एका कोचमध्ये स्पार्क झाला होता. ब्रेक किंवा गरम एक्सेल यांच्यामुळे स्पार्क झाला असेल. यामुळे काही प्रवाशी घाबरले. त्यांनी रेल्वेची चेन ओढली आणि त्यांनी खाली उड्या मारल्या. त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवर कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेस येत होती. घटनास्थीळी भुसावळहून आपत्ती व्यवस्थापन रेल्वे रवाना करण्यात आली आहे.
अपघातानंतर पुष्पक एक्स्प्रेस पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली, त्यानंतर संध्याकाळी सहाच्या दरम्यान मुंबईकडे रवाना करण्यात आली आहे. तर कर्नाटक एक्स्प्रेस दुर्घटनास्थळी आहे. भुसावळ हून मुंबईकडे येणाऱ्या आणि भोपाळकडे जाणाऱ्या गाड्या जागेवरच थांबवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाही संपर्क करत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक झालेला अपघात दुर्दैवी असून यात काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.


