रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11वर; मुख्यमंत्री फडणवीसांकडून मृतांच्या कुटुंबियांना रु.5 लाख आर्थिक मदतीची घोषणा

मुंबई – जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीकच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत. तेथून त्यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली. दुर्घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन पोहचून मदत व बचावासाठी आवश्यक गोष्टींचे व्यवस्थापन करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दृकश्राव्य संदेश जारी केला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचा उल्लेख करून त्यांनी म्हटले आहे की, काही लोकांचा मृत्यूची ही घटना अतिशय वेदनादायी आहे. जळगांव जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत.
घटनास्थळी आठ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपत्कालीन यंत्रणासुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले आहे.
11 प्रवाशांचा मृत्यू, जखमींवर औषधोपचार सुरू – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
अपघाताबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, चार वाजताच्या सुमारास गाडीला आग लागल्याची अफवा पसरली आणि चेन खेचून रेल्वे थांबवण्यात आली. पाचोरा आणि जळगाव या दरम्यान गाड्या वेगाने प्रवास करतात. अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी उड्या मारल्या. त्यात उलट दिशेने आलेल्या पुष्पक एक्सप्रेसला प्रवाशांची टक्कर झाली आणि हा अपघात घडला.
या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अकरा प्रवाशांना साधारण दुखापत आहे आणि चार प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जेवढे प्रवासी जखमी आहेत त्यांना चांगली आरोग्यसेवा देण्याचे काम करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींवर औषधोपचार सुरू आहेत.





