‘औकातीत राहून बोलायचं, आम्ही xxxचे मोजतो’; व्यथा मांडण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला तानाजी सावंत नेमकं काय बोलले?

Tanaji Sawant : “अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही. आता आपण मांडीला मांडी लावून बसलो आहोत परंतु बैठकीतून बाहेर आल्यावर उलट्या होतात,”, असे विधान तानाजी सावंत यांनी केले होते. तानाजी सावंत यांनी भरसभेत राष्ट्रवादीबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तानाजी सावंत यांनी भर सभेत केलेल्या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट सत्तेतून बाहेर पडण्याची विनंती वजा आवाहन राष्ट्रवादीच्या दादा गटाकडून केले जात आहे. सावंत यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले. दिवसभर हे प्रकरण चर्चेत असतानाच त्यांच्याबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी गाव संवाद दौऱ्यात व्यथा मांडण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याची औकात काढण्याची घटना घडली आहे. ‘कुणाची तर सुपारी घ्यायची आणि कार्यक्रमात उभा राहून बोलायचं, चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा आम्हालाही कळतं, आम्हीही उडत्याचे मोजतो. औकातीत राहून बोलायचं’, असे म्हणत तानाजी सावंतांनी ग्रामस्थाला दम भरला. धाराशिवच्या वाशी तालुक्यातील कोठावळा पिंपळगाव गावात प्रकार घडला.
गावच्या शेजारी असलेल्या बंधाऱ्यावर दरवाजे बसवल्यास आजूबाजूच्या शेतात पाणी जाईल हे म्हणणे मांडण्यासाठी शेतकरी आला होता. शेतकऱ्याने त्यांचं मत मांडल्यानंतर सावंत म्हणाले, तुमचं मत लक्षात आलं तुम्ही खाली बसा. मी स्वत: इंजिनिअर आहे, तुम्ही बसा. तुमचं समाधान होण्याशी कारण आहे. तुम्ही आता सांगताय. गेल्या 10 वर्षात तुम्ही बोलले नाहीत, आज बोलताय. आपण विकासाचं बोलण्यासाठी आलोय. विकासाचं ऐका. कोणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही. गेले 15 वर्ष आपण ब्र शब्द काढला नाही. रस्तावर पाठिभर मुरुम कोणी टाकला पाहिलं नाही. 35 वर्ष फक्त पाण्याचं स्वप्न दाखवलं. 55 टक्के पाणी आपल्या भागात येत आहे. सुपारी घेऊन बोलायचं नाही. ऐकून घेतो म्हणजे काहीही बोलायचं नाही. मी गेल्या पाच वर्षात कोणालाही माघारी पाठवलं नाही. मी विठ्ठलाचा भक्त आहे.
दरम्यान, सावंत यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. शेतकरी ग्रामस्थाला अशा भाषेत बोलल्याने सोशल मीडियावर त्यांच्या या वक्त्व्यावरून सावंत यांच्यावर टीका होत आहे.




