धाराशिव : धाराशिव विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून एकत्र लढत असताना देखील शिवसेनेच्या ६० आमदारांविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्र येत विरोधात काम केले आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी केला आहे. मतदारसंघातील भूम-परंडा-वाशी नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारात त्यांनी हा आरोप केला आहे. सावंत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर बोचरी टीका करत स्वबळाचा नारा दिला होता. सावंत यांच्याविरुद्ध निवडणूक लढवलेल्या राहुल मोटेंनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर, सावंत यांनी नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित मेळाव्यात महायुतीमधील राष्ट्रवादीवर सडकून टीका केली होती. त्यानंतर, आता पुन्हा एकदा तानाजी सावंत यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एक असून राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही, या केलेल्या टीकेवर आज देखील आपण ठाम आहोत. राष्ट्रवादीने माझ्या मतदारसंघात देखील एकत्रितपणे मला विरोध केला. मी टीका केल्यानंतर त्यांना उत्तर देण्याचा नैतिक अधिकार राष्ट्रवादीला नसल्याचेही सावंत म्हणाले. या घडलेल्या विरोधातील गोष्टी आमदारांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितल्या का माहित नाहीत, पण मी माझी तक्रार माझ्या नेत्याकडे केली असल्याचे सांगत तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेंच्या कानावर ही बाब घातल्याचे सांगितले.