Gujarat Assembly Election: ओवेसींचा मुस्लीम मतदारांवर प्रभाव नाही, भाजपला होणार फायदा

अहमदाबाद – गुजरात विधानसभेची निवडणूक लवकरच होणार आहे. या राज्यात आतापर्यंत दुरंगी लढत होत आली आहे. मात्र यावेळी आम आदमी पक्षाने आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे लढत रंगतदार होणार आहे. असे असतानाच आता असदुद्दीन ओवेसी यांचा एमआएम पक्षही रिंगणात उतरला आहे. त्यामुळे लढत लक्षवेधी ठरणार आहे. मात्र ओवेसींचा येथील मुस्लीम बांधवांवर फारसा प्रभाव नसल्याचेही जनमत चाचणीत समोर आले आहे.
गुजरातमधील मुस्लिम समुदायाचे मत जेव्हा एका वाहिनीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही बाब समोर आली आहे. जेव्हा मुस्लिम मतदारांना ओवेसी यांच्याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांचा मुसलमानांवर प्रभाव नसल्याचे मत 69 टक्के मुस्लिमांनी व्यक्त केले. मात्र 31 टक्के जणांना प्रभाव असल्याचे वाटते आहे.
दरम्यान कॉंग्रेस पक्ष गुजरातमध्ये सत्तेसाठी लढतीत आहे की नाही की गुपचूप काम करतो आहे असे सवालही नागरिकांना विचारण्यात आले. तेव्हा बहुतेक जणांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप आणि आपच्या लढतीत कॉंग्रेस अजुनही स्पर्धेत असल्याचे मत 36 टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. तर 46 टक्के लोकांना कॉंग्रेस लढतीत असल्याचे वाटतच नाही. तर 18 टक्के लोकांनी कॉंग्रेस राज्यात गुपचूप तयारी करत असल्याची सहमती व्यक्त केली आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांची कॉंग्रेस अध्यक्षपदावर निवड झाली आहे. त्याचा कॉंग्रेसच्या स्थितीवर फार काही परिणाम होणार नाही असे मतही अनेक जणांनी व्यक्त केले आहे.





