FasTag Monthly Pass : टोलची कटकट संपली! आता 350 रुपयांत मासिक पास; ‘या’ नागरिकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
FasTag Monthly Pass :

FasTag Monthly Pass : राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझांवर होणारी गर्दी आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांसाठी आता केवळ 350 रुपयांत मासिक पास उपलब्ध करून देण्याची तयारी करण्यात आली आहे. ही सुविधा पूर्णपणे डिजिटल पद्धतीने फास्टॅगशी जोडली जाणार असल्याने टोल शुल्क भरण्याचा त्रास आणि लांबच लांब रांगा टाळता येणार आहेत.
टोल प्लाझांच्या परिसरातील अनेक नागरिकांना काम, शिक्षण अथवा अन्य कारणांसाठी दिवसातून अनेकवेळा टोल प्लाझा ओलांडावा लागतो. त्यामुळे वारंवार टोल शुल्क भरावे लागत असून वेळेचाही मोठा अपव्यय होत होता. यावर उपाय म्हणून सरकारने ही नवी डिजिटल व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नव्या प्रणालीअंतर्गत कोणत्याही कागदी प्रक्रियेची अथवा भौतिक कूपनची गरज भासणार नाही. संबंधित वाहनाच्या फास्टॅगलाच मासिक पास म्हणून मान्यता दिली जाईल.
यासाठी लाभार्थींना पत्ता पुरावा आणि वाहनाची कागदपत्रे संबंधित टोल ऑपरेटर किंवा अधिकृत पोर्टलवर सादर करावी लागतील. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित फास्टॅग टोल प्लाझाच्या प्रणालीशी जोडण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार असून टोल व्यवस्थापन अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.





