पुणे : ‘भ्रष्ट’ कारभाराचा कलंक थांबता थांबेना

पुणे (डॉ.राजू गुरव) –महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईट) गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे शालेय शिक्षण विभागालाच आणखी एकदा “भ्रष्ट’ कारभाराचा कलंक लागला आहे. शिक्षण विभागातील “भ्रष्ट’ कारभाराची प्रकरणे उघडकीस येण्याचे प्रकार वाढल्यामुळे शिक्षण विभागाच बदनाम झाला आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेकडे “टीईटी’ परीक्षेबाबतची सविस्तर माहिती मागविल्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शाळांमध्ये शिक्षकांच्या नोकऱ्यांसाठी “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचे केंद्र व राज्य शासनाकडून बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनुसार पहिली “टीईटी’ परीक्षा 15 डिसेंबर 2013 रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत एकूण सात परीक्षा झालेल्या आहेत. सन 2017-20 या तीन वर्षांच्या कालावधीतील “टीईटी’सह अन्य परीक्षा घेण्याचा ठेका जी.ए.सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीला देण्यात आले होते. पहिल्या सहा परीक्षामध्ये एकूण 86 हजार 298 उमेदवार उत्तीर्ण झाले होते. त्यात पेपर क्रमांक 1 मध्ये 42 हजार 713 व पेपर क्रमांक 243 हजार 585 उमेदवार उत्तीर्ण झाले.
आरोग्य, म्हाडा पाठोपाठ “टीईटी’ परीक्षेतील पेपर फुटीचे व गैरव्यवहाराचे धागेदोरे पुणे पोलिसांच्या हाती लागले आहे.
“टीईटी’ परीक्षेत घोटाळा झाल्याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी अहवाल आल्यानंतर तो राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतर तत्काळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. – विशाल सोळंकी,
शिक्षण आयुक्त





