पुणे – पुणे-सातारा रस्त्यावर डी मार्ट शेजारी देवयानी इलेक्ट्रॉनिक्स शोरुममध्ये तीन मे रोजी मोठा स्फोट झाला होता. या स्फोटाबद्दल तपास यंत्रणांनी संशयही व्यक्त केला. दरम्यान फॉरेन्सीकचा अहवाल प्राप्त होण्याअगोदरच शुक्रवारी पुन्हा एकदा पडझड झालेल्या शोरुममध्ये आग लागली. यामुळे सोसायटीतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.
देवायानी इलेक्ट्रॉनिक्समध्ये तीन मे रोजी झालेला स्फोट इतका तीव्र होता की दुकानाचे पीलर वाकले होते. दुकानाचे शटर 50 मीटर दुर रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडले होते. घटनेत दुकानाचा चालक आणि रस्त्यावरुण जाणारा एका हॉटेलचा मालक गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळी बीडीडीएस, एटीएस, गुन्हे शाखा आदी यंत्रणांची पथके दाखल झाली होती.
दरम्यान काही दिवसांतच दुकानचालकाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सध्या दुकान स्फोट झाल्यानंतर आहे त्या अवस्थेतच आहे. यामुळे भंगारवाले, कचरा वेचक आदी कोणीही तेथे जाऊन शोधाशोध करत आहेत. यातच कोणीतरी तेथील वायरींमधील तांब्याच्या तारा काढण्याचा प्रयत्न केल्याने आग लागली असल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली. शुक्रवारच्या घटनेनंतर सोसायटीने शोरुम बाहेर सुरक्षा रक्षक नेमला आहे.