‘त्या’ कार्यक्रमांना मी जाणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं स्पष्ट

पुणे – राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यातच ओमायक्राॅन या नवीन विषाणूच्या प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. सरकारकडून गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरी देखील काही ठिकाणी कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होताना दिसत आहे.
गर्दी टाळण्याचे आवाहन करत ज्या कार्यक्रमांत 50 पेक्षा अधिक लोक असतील अशा कार्यक्रमांना जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी काही पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेच त्यांच्या कार्यक्रमात गर्दी करत असल्याची टीका जनतेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे 50 पेक्षा अधिक लोक असलेल्या कार्यक्रमांना जाणार नसल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करावेत, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासात 9170 नवीन करोनारुग्णांची नोंद झाली आहे. तर देशात 24 तासात 27553 नवीन करोनारुग्ण आढळले आहेत. देशात ओमायक्राॅनचे रुग्णांची संख्या 1431 च्या पुढे गेली आहे.





