नवी दिल्ली – येथे इस्रायली दुतावासापुढे झालेल्या बॉम्बस्फोट स्थळाची सफाई घाईघाईने केल्याने महत्त्वाचे न्यायवैद्यक पुरावे नाहीसे झाले. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच घटनास्थळावर लावलेले अडथळे हटवले. त्यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांना या भागाची सफाई करण्याची परवानगी दिली. हा भाग पुन्हा बंद करण्यापुर्वी केंद्र सरकारच्या यंत्रणांना जवळपासच्या हिरवळीवर बॉम्बचे सुटे भाग पडलेले दिसले.
या बॉम्बस्फोटाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवल्यानंतर दिल्ली पोलिसांचा हा निष्काळजीपणा समोर आला. दरम्यान, इस्रायली राजदूत दररोज पाच वाजता कार्यालयातून निघतात. मात्र त्यांची एक बैठक लांबल्याने त्या दिवशी निघण्यास उशीर झाला, असे गुप्तचर खात्यातील सूत्रांनी सांगितले. मात्र, त्या अधिकाऱ्याची ओळख सांगण्यास त्यांनी नकार दिला.
हे कृत्य करणाऱ्यांनी या अधिकाऱ्यांच्या बाहेर पडण्याच्या वेळेची टेहळणी केली असावी. त्यानुसार या बॉम्बचे टायमिंग सेट केले असावे, असे एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. उद्योगपती आणि माजी संसद सदस्य नवीन जिंदाल तांच्या पाच एपीजे अब्दूल कलाम रस्त्यावरील निवासस्थानाच्या हिरवळीवर या बॉम्बच्या वेळेच्या नियंत्रणासाठी वापरलेल्या टायमरच्या सर्किट बोर्डचे सुटे भाग सापडले. हा भाग घटनास्थळापासून किमान 100 मिटर अंतरावर आहे.
हा बॉम्ब धातूच्या अवरणात पॅक केलेला असावा. तसेच त्यात बॉल बेअरिंगचा वापर केला असावा. हा अत्याधुनिक प्रकारे बनवलेला बॉम्ब असण्याची शक्यता न्यायवैद्यक खात्यातील सूत्रांनी सांगितली. या तपासाशी संबंधित असणाऱ्या या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, हा स्फोट झाला त्यावेळी त्याच्या जवळ कोणी असते तर त्याचा प्राण जाऊ शकला असता किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आले असते. सध्या घटनास्थळाजवळ असणाऱ्या कॅनडीयन दुतावासातून दोन संशयितांचे अस्पष्ट फुटेज मिळाले असून ते मोठे करण्यात येत आहे.
या हल्ल्यात इराणच्या गुप्तचर खात्याचा किंवा त्यांच्या हस्तकांचा सहभाग असू शकतो किंवा हे एखाद्या दहशतवादी संघटनांचे कृत्य असू शकते. त्यामुळे आपल्यावरील दबाव वाढला आहे. हा हल्ला घडवू शकणाऱ्या संशयितांची यादी खूप मोठी आहे. मात्र यातील सूत्रधाराला पुराव्यावरून शोधावे लागेल. हेतूवरून नाही. त्यामुळे त्याला काही काळ जावा लागेल. याबाबत आम्ही काही काम करत आहोत, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याने सांगितले. यापुर्वीही दहशतवादी घटनांच्या तपास प्रक्रियेच्या आचार संहितेचे दिल्ली पोलिसांनी अनेकदा उल्लंघन केले आहे.